मोरोक्कोला देणार चिलखती वाहने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आफ्रिकेतील मोरोक्को या देशासाठी टाटा कंपनी चिलखती वाहनांची निर्मिती करणार आहे. या चिलखती वाहनांचे तंत्रज्ञान भारताच्या डीआरडीओ या संस्थेने विकसीत केले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावर या वाहनांची निर्मिती करण्याचे कंत्राट मोरोक्कोने टाटा कंपनीला दिले आहे. शस्त्रास्त्र निर्यात वाढविण्याच्या भारताच्या धोरणाचा एक भाग म्हणून या वाहनांची निर्मिती होणार आहे.
टाटा अॅडव्हान्स सिस्टिम्स ही कंपनी आणि मोरोक्कोच्या शाही सशस्त्र दलामध्ये सोमवारी या संबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. टाटा मोटर्स या कंपनीनेही या वाहनांचे प्रारुप सज्ज करण्यासाठी डीआरडीओला सहकार्य केले आहे. हा करार हे भारताच्या शस्त्रनिर्यात धोरणातील महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
सर्वात मोठे कंत्राट
टाटा कंपनीला मोरोक्कोकडून मिळालेले हे कंत्राट चिलखती वाहनांच्या संदर्भात आतापर्यंतचे सर्वात मोठे आहे. या कंत्राटाअंतर्गत निर्माण होणारी चिलखती वाहने भूमी आणि पाणी अशा दोन्ही स्थानी कार्य करु शकतील. ही युद्धात उपयोगी ठरणार असून हल्ला करणारी वाहने म्हणून विकसीत करण्यात येणार आहेत. ही वाहने भक्कमपणा, टिकावूपणा, वेग आणि सुरक्षिता या चारही महत्वाच्या आघाडीवर सरस ठरतील अशा प्रकारे निर्माण करण्यात येणार आहेत. दलदलीच्या क्षेत्रात, सपाट किंवा उंचसखल भूमीवर, खडकाळ भागात, झुडुपांच्या प्रदेशात आणि कोणत्याही हवामानात, तसेच दुर्गभ भागात सहजगत्या कार्यरत राहू शकतील. भूसुरुंगही या वाहनांची हानी करु शकणार नाहीत. शत्रूवर आक्रमण करण्यासाठी, सैनिकांच्या प्रवासासाठी, साधनसामग्रीच्या वाहतुकीसाठी अशा विविध प्रकारे त्यांचा उपयोग केला जाऊ शकणार आहे. सेनेसाठी, तसेच अर्धसैनिक दलांसाठी याच वाहनांच्या दोन भिन्न आवृत्त्या निर्माण केल्या जाणार आहेत. या वाहनांचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे, अशी माहिती डीआरडीओ कडून उपलब्ध झाली आहे.