शस्त्रसंधी: कोण जिंकले? कोण हरले?
झकास काम झाले. दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर अचानक हल्ला सुरु करून भारतीय लष्कराने पाकिस्तानला अजून एक जोरदार धडा शिकवला. पण एव्हढे करून तो खरोखरच धडा शिकला की नाही हे काळच सांगेल. पण शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या मध्यस्थीने जाहीर झालेल्या शस्त्रसंधीने पाकिस्तानचेच जास्त नुकसान केले असे स्पष्ट दिसत आहे.
चार दिवस चाललेल्या या लढाईत पहिल्यापासून भारत एवढा वरचढ राहिला की हे सारे प्रकरण एकतर्फी होत चालले होते. पाकिस्तानच्या 5-6 मुख्य विमानतळावर जोरदार गोळीबारी करून भारताने एकप्रकारे त्याला भयंकर जायबंदी केले होते. पाकिस्तानचे अंतर्गत वातावरण तापलेले असल्याने त्याच्यापुढे इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली. याचा अर्थ भारताने सगळेच बरोबर केले काय? याबाबत देखील उलटसुलट चर्चा होऊ शकते. देशाला एव्हढ्या युद्धाच्या खाईत लोटून सरकारने काय कमावले. पाकिस्तानकडून सुरु असलेला दहशतवाद पूर्ण बंद झाला काय? होणार काय? ज्या पद्धतीने हे सारे अचानक थांबवले त्याचा अर्थ ‘चुन, चुन के मारेंगे’ चे काय झाले? देशाच्या सीमावर्ती इलाक्यात जम्मू पठाणकोट, पूंछ वगैरे भागात पाकिस्तानच्या कारवाईने बरेच नुकसान झाले.
भारताच्या कारवाईने पहिल्या दोन तीन दिवसात अमाप मार खाल्लेले पाकिस्तानी लष्कर आता काहीतरी वेडे कृत्य करेल की काय याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली होती त्यामुळे शस्त्रसंधी झाली ते बरे झाले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना कामाला लावून भारत आणि पाकिस्तानला शांत करण्याचे प्रयत्न करतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. ते खरे ठरले. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स यांनी भारत-पाक मध्ये सुरु झालेल्या चकमकीत अमेरिकेला नाक खुपसण्याचे काम नाही असे म्हटले. पण राजकीय वर्तुळात त्याचा अर्थ वेगळा काढला गेला. पाकिस्तानला भारत चांगला धडा शिकवत असताना आम्हाला त्यात मध्ये पडावयाचे नाही असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ जाणकार काढत होते.
कारगिल युद्धाच्या वेळी देखील अमेरिकेने मध्यस्थी केलेली होती पण तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी त्याबाबत जाहिरातबाजी टाळली होती. भारताला जेव्हढे अडचणीत टाकले जाईल तेव्हढा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपला फायदा राहील असे पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र
(ऑल वेदर फ्रेंड ) चीनला वाटत होते. म्हणून तो पाकिस्तानचा वापर करू शकतो याची अमेरिकेला जाणीव आहे. अमेरिका असो की चीन, पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये वापराचीच वस्तू राहिला. त्यातून त्याने आणि त्याच्या लष्कराने खूप कमावले आणि खूप गमावलेदेखील. त्यामुळे पाकिस्तानची औकात काय ती साऱ्या जगाला माहित आहे. पाकिस्तानमधील वाढता दहशतवाद हा त्याने भारताला डसवण्यासाठी दहशतवादाचा साप पाळला त्यामुळे निर्माण झालेला आहे.
येत्या काळात भारताची कारवाई कशा प्रकारची राहणार हे चीन पाकिस्तानच्या मदतीला कशाप्रकारे धावणार यावर अवलंबून होते. 2020 साली लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर भारत आणि चीन सीमेवर शांतता असली तरी तणाव आहे. स्थानिक पातळीवर तसेच उच्च लष्करी स्तरावर चिक्कार बैठका घेऊनदेखील चीन तसूभरदेखील मागे सरलेला नाही. त्याने आपली 4500 चौरस किलोमीटर जमीन बळकावलेली आहे. राजकीय पातळीवर देखील बोलणी होऊनदेखील फारशी परिस्थिती सुधारलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.
पाक बरोबरील या चकमकीत भारताला कोणत्याही प्रकारे त्रास होणे हे अमेरिकेच्या हिताचे नाही हे ट्रम्प जाणतात. त्यांनी सध्या चीनविरुद्ध उभा दावा पुकारला आहे. आत्तापर्यंत झालेल्या विविध कारवाईत रशिया आणि फ्रान्स तसेच इस्राईलने भारताला दिलेली विविध अस्त्रs आणि विमाने चांगली काम करताना दिसून आलेली आहेत. चीनने पाकिस्तानला दिलेली वेगवेगळी शस्त्रात्रे देखील आंतरराष्ट्रीय जगात वाखाणली जात आहेत. भारत सरकारच्या कंपन्यांनी बनवलेली तसेच खाजगी क्षेत्राने बनवलेली काही क्षेपणास्त्रs तसेच ड्रोन हे चांगले काम करताना दिसून आलेले आहेत. याउलट तुर्कीने पाकिस्तानला पुरवलेले ड्रोन हे नाकाम दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात फ्रेंच कंपनीचे शेअर थोडे पडले आहेत तर चिनी कंपनीचे वधारले आहेत यावरून जाणकार योग्य तो संदेश घेत आहेत. माथेफिरू पाकिस्तानकडून फार सूज्ञपणाची अपेक्षा करणेच वेडेपणाचे आहे. विषारी नागाने डंख मारायचे कधी सोडले आहे का? हा सारा प्रकार काय वळण घेतोय त्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात चिंता निर्माण झाली होती. पाकिस्तान आणि त्याचा मुल्ला जनरल असीम मुनीर यांची खोड भारताने सध्या तरी जिरवली आहे.
अल्ला, आर्मी आणि अमेरिका या तीनवर विसंबून पाकिस्तानची गाडी चालते असे मानले जाते. त्यातील अमेरिका हा त्याच्या वागण्याला कंटाळला आहे तर कधी नव्हे एवढे तेथील लष्कराबाबत सामान्य लोक चिडलेले आहेत. आर्थिक दृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान आता केवळ ‘अल्ला भरोसे’ आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून नवीन कर्ज काढण्यासाठी त्याची तयारी चालली असताना त्याला हे कर्ज मिळू नये यासाठी भारत काम करत होते. हा पैसा शेवटी लष्कराच्या खिशात जातो असा त्याचा दावा आहे. अमेरिकेने त्याला कर्ज देऊ केले खरे पण त्याच्याकडून शस्त्रसंधी देखील करवली.
पाकिस्तानात देशांतर्गत परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक होते आहे. सामान्य माणसाला दैनंदिन कामात सातवणाऱ्या लष्कराला तुम्ही सीमेवर जाऊन भारताशी का बरे लढत नाही आणि आम्हाला त्रास देता असे प्रश्न स्पष्टपणे विचारले जात आहेत. बलुचिस्तानमधील स्वातंत्र्याच्या लढ्याने पेट घेतलेला आहे तर अफगाणिस्तानच्या सीमेलगत तालिबानी डोकेदुखी ठरत आहेत. अशावेळी पाकिस्तानचे लवकरच चार तुकडे होतील अशी भाकिते होत असल्याने पाश्चात्य देश चिंतीत आहेत. अण्वस्त्रधारी पाकिस्तानचे तुकडे पडले तर जागतिक शांतता आणि सुव्यवस्थेला धोका उत्पन्न होईल अशी त्यांना भीती आहे.
वेळप्रसंगी गवत खाऊन जगू पण अण्वस्त्र बनवू, अशी वल्गना पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो करायचे. त्या भुट्टोना फासावर लटकावून सत्तेत आलेल्या जनरल झिया उल हक यांनी आपली सत्ता टिकावी म्हणून लष्करासह देशाचे इतके इस्लामीकरण केले की त्यातून तो देश उठलाच नाही. पाकिस्तान हे ‘फेल स्टेट’ आहे, मेलेला देश आहे हे जगाला कळत आहे पण त्याचे काय करायचे हे जगाला कळत नाही आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा पाकिस्तान हा केंद्रबिंदू आहे आणि तेथील लष्कर हे दहशतवाद्यांच्या ओंजळीने पाणी पिते हे परत एकदा सिद्ध झालेले आहे. पाकिस्तानचे लष्कर हे एक ‘बंडखोर सेना’ (इंसर्जन्ट आर्मी) आहे असे एका तज्ञाने म्हटले आहे. याचा अर्थ काहीही करून भारतावर बदला घेण्याच्या सुडाने ते पेटले असल्याने ते वस्तुस्थितीकडे लक्ष देत नाही. पाकिस्तानातील नेतेमंडळींना गेली सत्तर वर्षे लष्कराने गुंडाळून ठेवलेले आहे. जनरल आयुबखान यांनी ‘गाईडेड डेमोक्रसी’ आणली आणि लष्कराचे राज्य आणले.
‘ऑपरेशन सिंदूर’ने एक मात्र झाले. 50 वर्षानंतर प्रथमच पाकिस्तानच्या आत दूरवर भारताने हल्ला केला. 1971 मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. यावेळेला भारताने फक्त दहशतवाद्यांच्या वस्त्यांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांचा म्होरक्या मौलाना मजहूरच्या घरातील दहा सदस्यांना भारतीय लष्कराने यमसदनाला धाडून पाकिस्तानच्या छातीत धडकी भरवली. मित्र असो की शत्रू पाकिस्तानने त्याच्याशी घातच केलेला आहे. ज्या अमेरिकेने पाकिस्तानला सर्व प्रकारे पुरेपूर मदत केली त्याला देखील डसायला त्याने कमी केले नव्हते. अमेरिकेचा नंबर एक शत्रू असलेला ओसामा बिन लादेन याला गुपचूप शरण देऊन पाकिस्तानने एकाच वेळी इस्लामिक दहशतवादाला खतपाणी घातले. जेव्हा अमेरिकेचा दबाव फार वाढला तेव्हा त्याच ओसामाला पाकिस्तानने एक प्रकारे अमेरिकेच्या हवाली केले. पाकिस्तानच्या एका मुख्य कॅन्टोन्मेंटच्या जवळ राहात असलेला ओसामा तेथील लष्कराच्या सहानुभूतीमुळेच लपला हे जगजाहीर आहे.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडे ते वाकडेच राहते असे म्हटले जाते. आता जिहादी जनरल असीम मुनीरच्या मनात पुढे काय आहे त्यावरून भारत-पाक संबंध कोणते वळण घेणार ते ठरणार आहे.
सुनील गाताडे