चडचण येथे बँकेवर सशस्त्र दरोडा
8 कोटींची रोकड, 50 किलोचे दागिने लंपास : 7 ते 8 दरोडेखोरांकडून कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक
वार्ताहर/विजापूर
महाराष्ट्राच्या सीमेपासून जवळ असलेल्या विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सात ते आठ बुरखाधारी दरोडेखोरांनी पिस्तूल आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून व कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून दरोडा टाकला. यात अंदाजे 8 कोटींची रोख रक्कम आणि सुमारे 50 किलो सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती बँकेतील कर्मचारी आणि पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र, किती ऐवजाची लूट केली याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
दरोडेखोरांनी लुटलेले सोने आणि रोकड घेऊन वाहनातून महाराष्ट्राच्या दिशेने पलायन केले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेनंतर fिजल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांकडून तपशील गोळा केला जात आहे. दरोड्याचे वृत्त कळताच हजारोंच्या संख्येने नागरिक बँकेसमोर जमा झाले होते. पोलीस तपास वेगाने सुरू असून, राज्य आणि सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे.