For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जुनाला गीतेतील तत्वज्ञान स्मरले

06:53 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
अर्जुनाला गीतेतील तत्वज्ञान स्मरले
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

शुकमुनी श्रीकृष्णाचे निधन झाल्यावर पुढे काय काय झाले ते सांगत आहेत. ते म्हणाले, श्रीकृष्णाचे निधन झाले आहे ही गोष्ट दारुकाने सांगितल्यावर द्वारकेत एकच बोंब उठली. उग्रसेन कपाळ पिटून घेऊ लागला, वसुदेव डोके आपटून घेऊ लागला, प्रजाजन निरनिराळ्या पद्धतीने दु:ख व्यक्त करू लागले. कुणी कुणाचे सांत्वन करायचे हाच प्रश्न होता कारण सर्वांनाच अत्यंत दु:ख झाले होते. देवकी आणि रोहिणी मूर्च्छित होऊन जमिनीवर पडल्या. थोड्या वेळाने दोघी एकदमच शुद्धीवर आल्या आणि त्यांनी एकच आकांत मांडला.

देवकी म्हणाली, माझ्या नातवंडे आणि मुलाबाळांसकट सगळी वंशावळीची एकाचवेळी होळी झाली. यदुकुळात कुणी म्हणून उरलं नाही. पुढे तिने विचारले, सगळे यादव कुठे पडले आहेत? अक्रुरा तुला कृष्णाने कुठून इथे पाठवले? त्याजागी मला लवकर घेऊन चल. प्रभासला गेल्यावर रणात पडलेल्या निष्प्राण यादवांची कलेवरे अत्यंत शोकमग्न वातावरणात त्यांनी पाहिली. यादवांच्या प्रेताच्या ढिगाऱ्यात श्रीकृष्ण आणि बलरामाचे शव सर्वजण शोधू लागले पण आश्चर्याची गोष्ट अशी की, ती दोघेही त्यांना तेथे आढळली नाहीत.

Advertisement

श्रीकृष्ण, बलराम ह्यांचे मृतदेहही तेथे नाहीत हे पाहून ते हतबद्ध झाले. आधीच ते सर्वजण अत्यंत दु:खी होते त्यात श्रीकृष्ण, बलराम ह्यांचे मृतदेहही दिसत नाहीत म्हंटल्यावर उग्रसेन, वसुदेव, देवकी आणि रोहिणी दु:खाने मूर्च्छित झाल्या. तशा अवस्थेत त्यांच्या शरीरातील प्राण केव्हा निघून गेला हे कुणालाच कळले नाही. समस्त यादवांच्या पत्नी आपापल्या पतीसमवेत सती जायला सिद्ध झाल्या. श्रीकृष्णनाथांच्या कृपेने त्या सर्वांचा उद्धार झाला. श्रीकृष्णनाथांनी केवळ एक मित्र म्हणून, मैत्रीला जागण्यासाठी प्रियसखा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले होते.

श्रीकृष्णाच्या निधनाचे वृत्त ऐकून अर्जुनाला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. कृष्णविरहाने तो पूर्ण उद्विग्न झाला. कृष्णाबरोबर घालवलेले अनेक आनंदाचे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. त्याने अनेक कठीण प्रसंगी त्याचे प्राणपणाने केलेले संरक्षण त्याला आठवले. त्याने सांगितलेल्या गीतेतील तत्वज्ञान त्याला स्मरले. तो म्हणाला, कृष्ण म्हणजे त्याच्या मनाचे मन, बुद्धीचे आयतन, कृष्णप्रभा हे माझ्या ज्ञानाचे कारण मग मी आणि कृष्ण एकच म्हणायचे. तो माझ्यापेक्षा भिन्न असूच शकत नाही. कृष्णप्रभेमुळे मी पाहू शकतो, कृष्णाच्या अवधानाने मी ऐकू शकतो, कृष्ण बोलवतो म्हणून मी बोलू शकतो, असा आणि इतका जर कृष्ण माझ्या अंगात भिनला आहे मग मी कृष्णापेक्षा स्वत:ला वेगळा समजत असलो तर ती चूकच ठरेल. मला कृष्णाचा वियोग झाला आहे असे बोलणे मिथ्याच आहे. कृष्ण हाच माझा आत्मा आहे, तो माझ्या जीवाचे जीवन आहे, सबाह्य परिपूर्ण कृष्ण मीच आहे. माझे मन आपल्याला श्रीकृष्णाचा वियोग झाला आहे असे म्हणतंय परंतु ते तर केव्हाच कृष्णचरणी निमग्न झाले आहे. माणसे भिन्न भिन्न दिसतात खरी पण प्रत्यक्षात त्या सर्व कृष्णमूर्तीच आहेत. त्यामुळे जो स्वत:ला कृष्णापेक्षा वेगळा समजतो. त्यालाच श्रीकृष्णाचा वियोग झाला आहे असे म्हणता येईल. इतरांना मात्र श्रीकृष्ण सदैव जवळच आहे असे वाटेल. सर्व मूर्ती कृष्णरूपच आहेत असे म्हणायचे कारण म्हणजे माठाचे निरनिराळे आकार जरी दिसत असले तरी ते सगळे मातीपासूनच तयार झालेले असतात. त्यामुळे ते मातीपासून वेगळे नसतात किंवा निरनिराळ्या रंगांनी रंगवलेले धागे कधी वस्त्रापासून वेगळे असू शकत नाहीत. त्याप्रमाणे सर्व माणसांच्यामध्ये कृष्णाचा वास असल्याने ती कृष्णरूप असतात. बरं कृष्णवियोग झालाय असं जिथं मी म्हणेन तिथेही श्रीकृष्णनाथाचे अस्तित्व आहेच. अशा निरनिराळ्या विचारांनी तो स्वत:चे सांत्वन करू लागला.

क्रमश:

Advertisement
Tags :

.