अर्जुन एरिगेसी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर
चेन्नई ग्रँड मास्टर्स स्पर्धेत अॅलेक्सी सरानावर विजय
वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नई येथे सध्या चालू असलेल्या चेन्नई ग्रँड मास्टर्स, 2024 मध्ये अॅलेक्सी सरानावर विजय मिळवल्यानंतर अर्जुन एरिगेसीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचप्रमाणे या 21 वर्षीय खेळाडूने मास्टर्स गटातील आपली आघाडी या जोरावर आणखी बळकट केली. तो तीन फेऱ्यांनंतर संयुक्तपणे अमीन तबताबाईसह आघाडीवर आहे.
‘एमजीडा1’द्वारे आयोजित आणि तमिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरणाद्वारे प्रायोजित चेन्नई ग्रँड मास्टर्स 2024 मध्ये मास्टर्स आणि चॅलेंजर्स या दोन श्रेणी आहेत. 2729 च्या सरासरी रेटिंगसह मास्टर्स गट यावेळी अधिक स्पर्धात्मक आहे. तर पदार्पण करणाया चॅलेंजर्स गटाची रचना उदयोन्मुख भारतीय प्रतिभेला उच्च दर्जाच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी देण्यासाठी केली गेली आहे.
काळ्या सोंगाट्या घेऊन सुऊवात करताना अर्जुनने ईस्ट इंडियन डिफेन्सच्या माध्यमातून सरानाच्या ‘क्वीन्स पॉन ओपनिंग’ला उत्तर दिले. त्यांच्यात जोरदार झुंज झाली. पण अर्जुनने एका टप्प्यावर वर्चस्व मिळविले आणि नंतर त्याचे रूपांतर स्पर्धेतील त्याच्या दुसऱ्या विजयात केले. त्याच्या या विजयाने त्याला 2800 चे एलो रेटिंग पुन्हा मिळवून दिले आणि फॅबियानो काऊआनाच्या वर झेप घेऊन तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
दुसरीकडे, मास्टर्स प्रकारातील तिसऱ्या फेरीमध्ये अमीन तबताबाईने फ्रेंच ग्रँडमास्टर मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्हला पराभूत करताना प्रभावी रणनीती दाखवून व खेळ करून मोठा धक्का दिला. लेव्हॉन अरोनियननेही परहम मगसुदलूवर जोरदार विजय मिळवून स्पर्धेतील आपली बाजू मजबूत केली. दरम्यान, विदित गुजराथीने स्थानिक खेळाडू अरविंद चिदंबरमविऊद्धचा सामना बरोबरीत सोडवून सलग पराभवांतून उसळी घेतली.
प्रणव व्ही. ने चेन्नई ग्रँड मास्टर्स, 2024 मधील चॅलेंजर्स गटात आपली प्रभावीवाटचाल सुरू ठेवत कार्तिकेयन मुरलीला पराभूत करून सलग तिसरा विजय नोंदविला, तर प्रणेश एम.ने वैशाली रमेशबाबूवर विजय मिळवत आपली स्थिती मजबूत केली. हरिका द्रोणवल्ली आणि अभिमन्यू पुराणिक यांच्यातील सामना तसेच रौनक साधवानी आणि लिओन मेंडोन्सा यांच्यातील निकराचा सामना अनिर्णित राहिला. तीन फेऱ्यांनंतर अर्जुन आणि तबताबाई मास्टर्स गटात 2.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेला अरोनियन अर्ध्या गुणाने मागे आहे.