अरिहंत हॉस्पिटल ‘अलाईड कोर्सेस, डीएमएलटी-फिजिओथेरपी’ अभ्यासक्रम सुरू करणार
बेळगाव : रुग्णसेवेत अल्पावधीतच आपला ठसा उमटवून रुग्णांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या अरिहंत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे लवकरच ‘अलाईड कोर्सेस, डीएमएलटी व फिजिओथेरपी’ हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस’ने या अभ्यासक्रमाला मान्यता दिली असून श्रीनगर येथील दयानंद आर्केडमध्ये कॉलेज सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक व हृदयरोग तज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या अलाईड कोर्समध्ये कार्डियाक केअर ट्रिटमेंट, ओटी अँड अॅनेस्थेशिया डीएमएलटी यांचा समावेश असून यासाठी प्रत्येकी 20 जागांना मान्यता मिळाली आहे.
नर्सिंग कोर्ससाठी 60 तर फिजिओथेरपीसाठी 40 जागांना मान्यता मिळाली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात नर्सिंग आणि फिजिओथेरपी या दोन क्षेत्रात मनुष्यबळाची चणचण भासत आहे. याचा विचार करून अरिहंतने हे कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरपासून हे कॉलेज पूर्णवेळ सुरू होणार आहे. अरिहंत हॉस्पिटलने वैद्यकीय उपचार आणि संशोधन यामध्ये भरीव कार्य केले आहे. आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही अरिहंतने प्रवेश केला असून सदर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लासरुम, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण अशी डिजीटल लायब्ररी व सर्व सोयी सुविधांनीयुक्त क्लिनिकल लॅबोरेटरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय कॉलेज ते हॉस्पिटलपर्यंत वाहन सुविधाही देण्यात येणार आहे.
सदर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक वर्ष अरिहंतमध्येच इंटर्नशीप करणे बंधनकारक असणार आहे. नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणून डॉ. अशोक कामत तर फिजिओथेरपीसाठी डॉ. आरजू नुराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक संधी असून भारतातील 7 टक्के लोक परदेशांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र, आपल्या देशातील विद्यार्थ्यांनी आपल्याच देशात सेवा द्यावी, या हेतूने अरिहंतने हे कॉलेज सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. अरिहंतची स्थापना होऊन 3 वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत अरिहंतने 45 हजार रुग्णांवर उपचार केले असून 3 हजार रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया केली आहे. 1500 जणांचे डायलेसिस झाले असून 1 हजार रुग्णांची इंडोस्कोपी झाली आहे, असेही डॉ. दीक्षित यांनी नमूद केले. हॉस्पिटलमध्ये कार्डियोलॉजी, कार्डियाक सर्जरी, लहान मुलांवरील शस्त्रक्रिया, गॅस्ट्रो, न्युरॉलॉजी, न्युरोसर्जरी, जनरल मेडिसीन, ऑर्थोपेडिक, नेफ्रॉलॉजी, जनरल सर्जरी विभाग कार्यरत असून 24 तास येथे वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.