अल्झारी जोसेफला कर्णधाराशी वाद महागात, दोन सामन्यांचे निलंबन
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला क्रिकेट वेस्ट इंडिजने इंग्लंडविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मैदानावरील क्षेत्ररक्षरणाच्या रचनेबाबत उघडपणे मतभेद व्यक्त केल्याबद्दल दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. कॅरेबियन संघाने हा सामना 8 गडी राखून जिंकत तीन सामन्यांची मालिकाही जिंकली. पण वेगवान गोलंदाज जोसेफने आपल्या एका षटकात होपने केलेल्या क्षेत्ररक्षणाच्या रचनेला मैदानावर विलक्षण विरोध केल्यानंतर मैदान सोडले होते.
जोसेफने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या आधी तो आणि होप यांच्यात प्रदीर्घ वाद झाला होता आणि पंचांना त्यांना खेळ पुन्हा सुरू करण्यास सांगावे लागले होते। सदर षटकात एक चेंडू ऑफ साइडला खेळला गेल्यानंतर जोसेफने होपवर राग व्यक्त केला होता आणि षटक संपल्यावर तो मैदानातून निघून जाऊन थोड्या विश्रांतीनंतर परतला होता. क्रिकेट वेस्ट इंडीजने एका निवेदनात म्हटले आहे की, जोसेफचे वर्तन क्रिकेट वेस्ट इंडिजच्या व्यावसायिकतेच्या मानकांचे उल्लंघन करणारे आहे. अशा वर्तनाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. दरम्यान, जोसेफनेही घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.