For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जंटिनात नूतन राष्ट्राध्यक्षांपुढे आव्हानांचे डोंगर

06:49 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
अर्जंटिनात नूतन राष्ट्राध्यक्षांपुढे आव्हानांचे डोंगर
Advertisement

अर्जेटिना देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नुकतीच जेवियर मिलेई यांनी सरशी साधली आहे. 10 डिसेंबरपासून त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीला सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने आगामी काळात देशातील तीनअंकी असणारा महागाई दर आटोक्यात आणण्यासोबत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याची कसरत कारकिर्दीत पार पाडावी लागणार आहे.

Advertisement

अर्जेंटिना या देशात नुकतीच अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असून यामध्ये जहाल आणि उजव्या विचारसरणीचे नेते जेवियर मिलेई यांना विजयी होण्यामध्ये यश मिळाले आहे. आपल्या चार वर्षाच्या सत्तेच्या कारकिर्दीला 10 डिसेंबरपासून नूतन अध्यक्ष मिलेई हे सुरुवात करणार आहेत. मिलेई यांनी या निवडणुकीत अर्थमंत्री सर्जीओ मासा यांना मोठ्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला. अध्यक्षपदाच्या शर्यतीत मिलेई यांनी 56 टक्के मते प्राप्त केली आहेत तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले मंत्री सर्जीओ मासा यांना 44 टक्क्यांची मते मिळाली आहेत. 1983 नंतरच्या आत्तापर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या मत फरकांनी विजय होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विजयानंतर ब्यूनस आयर्समधील रस्त्यांवर त्यांच्या समर्थकांनी मोटारींसह हॉर्न वाजवत जल्लोषी मिरवणूक काढली.

Advertisement

पेरूनिष्ट सरकारला धक्का देत बदल म्हणून मिलेई यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 1991 पासून देशातील महागाई दर हा सर्वोच्च स्तरावर राहिला असल्याने देशाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. मिलेई यांना ऑक्टोबरमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत 30 टक्केपर्यंत मते मिळाली होती. मात्र नंतर मिलेई यांनी देशातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये जसे की राजधानी शहर ब्युनस आयर्स आणि मध्य कोरडोबा या भागांमध्ये आपली लोकप्रियता वाढवली. याच भागातून मतदारांचे चांगले पाठबळ मिलेई यांना मिळाले आणि 56 टक्के मतांची टक्केवारी प्राप्त केली. मिलेई यांना बहुमतासह सरकार स्थापन करण्याची संधी जरी मिळालेली नसली तरी आगामी काळामध्ये अर्जेंटिनाला अनेक आव्हानांमधून बाहेर काढण्याचे अवघड आव्हान पेलावे लागणार आहे. काँग्रेसमध्ये मिलेई यांच्याकडे कमीच जागा असून सिनेटमध्ये 72 पैकी 7 जागा त्यांच्याकडे असणार आहेत. खालच्या सभागृहामध्ये पाहता 257 पैकी 28 जागा त्यांच्याकडे असतील. मिलेई यांना चलनाचे डॉलरीकरण करायचे असून याला काहीअंशी विरोधकांचा व सार्वजनिकांचाही प्रतिसाद मिळतो आहे. दोन दशकांपासून दक्षिण अमेरिकेमध्ये आर्थिक संकटांचे ढग दाटलेले असताना मिलेई यांना निवडणुकीमध्ये यश मिळालेले असले तरी त्यांच्यासाठी आगामी काळात देशाची आर्थिक स्थिती बळकट करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सरकारच्या होणाऱ्या खर्चामध्ये आगामी काळामध्ये कपात करण्याचा इरादाही मिलेई यांनी निवडणूक प्रचारात व्यक्त केला होता, त्याची अंमलबजावणी आता पुढील काळात करावी लागणार आहे. देशात सध्याला 40 टक्केपेक्षा जास्त प्रमाण गरिबीचे आहे. तीन अंकी असणारा महागाई दर कमी करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. सध्याचा देशाचा महागाई दर हा 143 टक्के आहे.

नूतन अध्यक्ष जेवियर मिलेई हे 53 वर्षीय असून अर्थतज्ञ आहेत. बऱ्याच वेळेला लेदर जॅकेट परिधान करतात व केसांची त्यांची शैली वेगळ्याच धाटणीची आहे.  असे रूप पाहिल्यावर त्यांची गणना अनेकजण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करतात. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मिलेई हे समर्थक आहेत. त्याचप्रमाणे ब्राझीलचे माजी नेते जेअर बोल्सनारो यांच्यासारखीही त्यांची प्रतिमा आहे.

अर्थव्यवस्थेची स्थिती

देशांतर्गत चलनाच्या दरात घट होताना दिसते आहे. अर्जेंटिनामध्ये  त्यांचे पेसो हे चलन वापरात आहे. विदेशी चलन साठ्याच्या बाबतीतही देशाची नकारात्मक स्थिती असल्याने यातूनही वाट काढणे सरकारसाठी अडचणीचे असणार आहे. आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जवळपास 44 अब्ज डॉलरचे कर्जही या देशाने घेतलेले आहे. देशाला आपली अर्थव्यवस्था डॉलरच्या चलनाच्या आधारावर चालवायची आहे. अमेरिकन डॉलरच्या चलनाचा वापर देशामध्ये केला गेल्यास नाणेनिधी धोरणावरचा हक्क देशाला गमवावा लागण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. महागाईचा भस्मासूर दूर करण्यासाठी चलनाचे डॉलरीकरण करणे आवश्यक असल्याचे मतही राष्ट्राध्यक्षांनी नोंदवले आहे. विदेशी चलन साठ्याच्या घसरणीबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने इशाराही दिला होता. देशातील मध्यवर्ती बँक सेंट्रल बँक ऑफ अर्जेंटीना बंद करण्यासोबत देशाचे चलनही वापरासाठी बंद करण्यासंदर्भातला निर्णय अवलंबणे मिलेई यांच्यासाठी आगामी काळात अवघड असणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

काय करणार उपाययोजना...

सरकारने महागाईशी दोन हात करण्याचा इरादा व्यक्त केला असून सत्ता स्थापनेनंतर त्यादृष्टीने प्रयत्नांना धार चढवली जाणार आहे. सार्वजनिक खर्चामध्ये 15 टक्क्यांपर्यंत बचत करण्याचा नव्या सरकारचा इरादा आहे. खासगी कंपन्यांना देण्यात येणाऱ्या इंधन, वाहतूक व विजेसंदर्भातील सवलती कमी करण्याचाही विचार सरकारने चालवला आहे. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये मिलेई यांनी सरकारी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट करण्याचे आश्वासन दिले होते, त्याप्रमाणे त्याचे नियोजन करण्यावर आता पुढील काही दिवसांत भर असेल. एकीकडे हे सर्व करत असताना संस्कृती, महिला आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय बंद करण्याचेही त्यांनी निवडणूक प्रचारात सुचित केले होते.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेवियर यांचे अभिनंदन केले आहे. देशातील स्थानिक मीडिया जेवियर यांना अर्जेंटिनाचे डोनाल्ड ट्रम्प म्हणूनच संबोधतात. ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सनारो यांनाही अर्जेंटिनामध्ये जेवियर हे निवडून येतील असा विश्वास होता. जेवियर यांनी आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये आपण सत्तेत आल्यास बदल आणणार असल्याची घोषणा केली होती. ज्याचा फायदा त्यांना निवडणुकीच्या दिवशी झालेला पाहायला मिळाला. आता विजयी झाल्यानंतर घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मिलेई यांना आगामी काळात प्रयत्न करावे लागतील.

या आश्वासनांचे काय होणार?

अर्जेंटिनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेवियर मिलेई यांना कल्याणकारी योजनांवरचा खर्च कमी करायचा आहे. देशाच्या विकासासाठी वायफळ होणाऱ्या खर्चावर लगाम घालण्याचा विचार नूतन अध्यक्षांनी केला आहे. त्यादृष्टीने सरकार आगामी काळामध्ये योजना तयार करणार आहे. निवडणूक प्रचारात मानवी अवयवांच्या खरेदी विक्री व्यवहाराला कायदेशीर मंजुरी देण्याबाबतही त्यांनी आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे शस्त्र बाळगण्यासंदर्भातील कायद्यात सूट देण्याचेही त्यांनी म्हटले होते. देशामध्ये 2020 पासून गर्भपात कायद्याला मंजुरी दिली होती ती मागे घेण्याचेही आश्वासन मिलेई यांनी दिले होते. सदरच्या आश्वासनाच्या बाबतीतही आगामी महिन्यांमध्ये सरकारला रणनीती जाहीर करावी लागणार आहे. वरील सर्व आश्वासने आत्मसात करायची झाल्यास इतर सदस्यांचा पाठिंबाही यापूर्वी मिलेई यांना मिळवावा लागणार आहे.

जेवियर यांचा परिचय

नूतन अध्यक्ष जेवियर मिलेई यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1970 मध्ये झाला. अर्थशास्त्रात ते प्रवीण आहेत. राजकीय नेते असण्यासोबतच ते अर्थतज्ञ व लेखकही आहेत. अर्थशास्त्राचे ते 21 वर्षे प्राध्यापक राहिले आहेत. याचविषयांवर त्यांनी खूप सारी पुस्तकेसुद्धा लिहिली आहेत. दूरदर्शनवर त्यांनी जवळपास या विषयाशी संबंधीत 235 जणांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यामुळे या विविध माध्यमातून अनेकांना ते माहित झालेले आहेत.

नूतन अध्यक्षांचे बोल

निवडून आल्यानंतर बोलताना नूतन अध्यक्ष जेवियर यांनी, आम्ही आता नवी सुरुवात करत आहोत. कधीकाळी आपला देश हा सर्वात श्रीमंत होता. आज आमचा नंबर 130 वा आहे. त्यामुळे आता नव्याने लढाई लढावी लागणार असून देशाला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी आपले प्रयत्न असतील. आपल्याला पुन्हा जागतिक पटलावरती शक्तिमान बनायचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  येणाऱ्या काळात आव्हनांचे डोंगर मिलेई कसे पार करतात हे पाहावे लागणार आहे.

अतुल देशमुख

Advertisement
Tags :

.