अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका विजेता
कोलंबियावर 1-0 ने मात, एकंदरित विक्रमी 16 वे जेतेपद, स्पेनच्या पराक्रमाशीही बरोबरी
प्रतिनिधी/ मडगांव
लिओनेल मेस्सीला दुसऱ्या सत्रात झालेल्या दुखापतीवर मात करत अर्जेंटिनाने लॉटारो मार्टिनेझने 112 व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर कोलंबियावर 1-0 अशी मात केली आणि सलग दुसरी कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली.
64 व्या मिनिटाला धावताना पडून मेस्सीला दुखापतीचा सामना करावा लागला. त्यानंतर बेंचवर बसून रडत आपला चेहरा आपल्या हातांनी झाकणारा मेस्सी सर्वांना पाहायला मिळाला. रविवारी रात्री अर्जेंटिनाला विक्रमी 16 व्या कोपा अमेरिका विजेतेपदापर्यंत घेऊन जाणाऱ्या गोलनंतर मार्टिनेझने आपल्या कर्णधाराला मिठी मारण्यासाठी त्या बेंचकडे धाव घेतली.
हार्ड
रॉक स्टेडियमवर गर्दीच्या त्रासामुळे 1 तास 22 मिनिटे इतक्या उशिरा सुरू झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने 2021 ची कोपा अमेरिका आणि 2022 च्या विश्वचषकानंतर सलग तिसरे मोठे विजेतेपद पटकावले. त्यासरशी 2008 आणि 2012 च्या युरोपियन चॅम्पियनशिप आणि 2010 सालचा विश्वचषक जिंकणाऱ्या स्पेनंच्या कामगिरीची त्यांनी बरोबरी साधली
अर्जेंटिनाने 28 सामने अपराजित राहिलेल्या कोलंबियाची ती मलिकाही या विजयाने खंडित केली. 97 व्या मिनिटाला मार्टिनेझने प्रवेश केला आणि जिओवानी लो सेल्सोच्या अचूक पासवरून गोल केला. पेनल्टी क्षेत्राच्या किंचित आतून हा फटका हाणत मार्टनेझने त्याच्या 29 व्या आंतरराष्ट्रीय गोलाची आणि स्पर्धेतील पाचव्या गोलाची नोंद केली.
मध्यरात्रीच्या सुमारास अंतिम शिटी वाजल्यानंतर लंगडत चालणाऱ्या मेस्सीने 36 वर्षीय निकोल्स ओटामेंडी आणि एनजेल डी मारा या त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्यांना त्याच्यासोबत ट्रॉफी उचलण्यासाठी इशारा केला. यापैकी डी मारा हा राष्ट्रीय संघातून निवृत्त होत आहे. वयाच्या 37 व्या वर्षी 39 व्या आणि बहुतेक करून शेवटच्या कोपा अमेरिका सामन्यात भाग घेतलेल्या मेस्सीला या स्पर्धेत केवळ एक गोल करता आला.