अर्जेंटिनाचे पुरुष-महिला हॉकी संघ विजेते
वृत्तसंस्था/ लॉसेनी (स्वीस)
2024 च्या कनिष्ठांच्या पॅन अमेरिकन चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेत अर्जेंटिनाने दुहेरी मुकुट साधला. या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या पुरुष संघाने कॅनडाचा पराभव करत सुवर्णपदकासह जेतेपद पटकाविले. तर महिलांच्या विभागातील अंतिम लढतीत अर्जेंटिनाने अमेरिकेचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. आता आगामी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2025 च्या कनिष्ठांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पॅन अमेरिकन स्पर्धेतून एकूण 7 संघांनी आपले स्थान निश्चित केले.
पुरुषांच्या विभागात तीन संघांसाठी तर महिलांच्या विभागात 4 संघांसाठी जागा रिक्त होत्या. 2025 साली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा होणार असून यामध्ये एकूण 24 संघांचा समावेश राहिल. या स्पर्धेचे स्वरुप विस्तारित करण्यात आले आहे. पॅन अमेरिकन स्पर्धेतील पुरुषांच्या विभागात कॅनडाने रौप्य तर चिलीने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या विभागात अमेरिकेने रौप्यपदक तसेच चिलीने कांस्यपदक मिळविले. उरुग्वेला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आगामी कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी अर्जेंटिनाच्या पुरुष आणि महिला संघांनी आपली पात्रता सिद्ध केली.
लॉसेनीमध्ये झालेल्या पॅन अमेरिकन चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या विभागात अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा, चिली, मेक्सिको, अमेरिका यांनी राउंड रॉबिनचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. अर्जेंटिना संघाने आपल्या गटात आघाडीचे स्थान मिळविताना 15 गुण तर कॅनडाने 10 गुणासह दुसरे तसेच चिलीने 9 गुणासह तिसरे स्थान मिळविले. अमेरिका 7 गुणासह चौथ्या स्थानावर राहिला. हे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. त्यानंतर पहिल्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने अमेरिकेचा 3-0 तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात कॅनडाने चिलीचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
महिलांच्या विभागात अर्जेंटिना, कॅनडा, चिली, मेक्सिको, अमेरिका व उरुग्वे यांनी आपला राउंड रॉबिन पहिला टप्पा पूर्ण केला. अर्जेंटिनाने 15 गुणासह पहिले, अमेरिका 12 गुणासह दुसऱ्या तर चिली 9 गुणासह तिसऱ्या स्थानावर राहिले. उपांत्य फेरीत प्रवेश करणारा उरुग्वेचा संघ 6 गुणासह चौथा ठरला. अर्जेंटिनाच्या महिला संघाने उपांत्य सामन्यात उरुग्वेचा 5-0 तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेने चिलीचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.