अर्जेंटिना, फ्रान्स, जर्मनी उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ ग्रोनिनजेन (नेदरलँड्स)
2025 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेमध्ये अर्जेंटिना, फ्रान्स आणि जर्मनी यांनी अनुक्रमे नेदरलँड्स, क्रोएशिया आणि जपान यांचा पराभव करत फायनल्स-8 फेरीत प्रवेश केला.
जर्मनी आणि जपान यांच्यातील झालेल्या लढतीत दुहेरीच्या सामन्यात केव्हिन क्रेव्हिझ आणि टीम पझ या जर्मनीच्या जोडीने जपानच्या वाटानुकी आणि युझूकी यांचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव केला. या विजयामुळे सदर स्पर्धेच्या दुसऱ्या पात्र फेरीमध्ये जर्मनीने जपानवर 3-0 अशी एकतर्फी आघाडी घेत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता येत्या नोव्हेंबर महिन्यात इटलीत होणाऱ्या या स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये प्रवेश मिळविणारा जर्मनी हा पहिला संघ ठरला आहे. यजमान इटलीनेही या फेरीत आपले स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे.
अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यातील लढतीत अर्जेंटिनाच्या अँड्रेस मोल्टेनी आणि झेबालोस यांनी नेदरलँड्सच्या झेंडस्कल्प आणि अॅरेंड्स यांचा 6-3, 7-5 असा पराभव केला. त्याचप्रमाणे मॉटेटने दुसऱ्या एकेरी सामन्यात क्रोएशियाच्या सिलिकचा 7-5, 6-4 असा पराभव करत फ्रान्सला या स्पर्धेच्या फायनल-8 मध्ये स्थान मिळविले. फ्रान्सने या लढतीत क्रोएशियाचा 3-1 असा पराभव केला. डेव्हिस चषक स्पर्धेच्या अन्य लढतीमध्ये डेन्मार्कने स्पेनवर 2-0, बेल्जियमने ऑस्ट्रेलियावर 2-0 अशी आघाडी घेतली आहे.