क्षेत्राची ओळख
अध्याय नववा
जो भक्त स्वत:चं संपूर्ण जिवीत ईश्वराला अर्पण करून अत्यंत समाधानी वृत्तीने जीवन जगत असतो त्याचे सुखदु:ख, रागलोभ आदि विकार नाहीसे झालेले असतात. असा जो निर्विकार होतो तो क्षेत्रक्षत्रज्ञविचार जाणून असतो, असं बाप्पा म्हणाले. माहित असणे आणि जाणणे यात फरक येतो. माहिती आपल्याला कुठूनही मिळू शकते. सध्याच्या इंटरनेटच्या युगात अगदी हवी तेव्हढी माहिती आपल्याला विनासायास मिळू शकते पण मिळालेली माहिती पचवणे म्हणजे त्या माहिती बरहुकूम अवस्था अनुभवणे हे येरा गबाळ्याचे काम नसते. उदाहरणार्थ पोहावे कसे हे पुस्तकात सचित्र माहितीसह दिलेले असते पण ते वाचून एखाद्याने पाण्यात उडी मारल्यावर त्याची काय अवस्था होते याची कल्पना आपण करू शकतो. कारण मिळालेल्या माहितीचा केव्हा आणि कोठे उपयोग करायचा हे त्याला समजलेले नसते.
हे लक्षात घेऊनच बाप्पांनी वरेण्याला सांगितलं की, जो समाधानी आहे, ईश्वराला समर्पित आहे आणि ईश्वर सगळ्याचा कर्ता आहे तर मग आपल्याला कुणावर रागवायचा वा प्रेम करायचा किंवा एखाद्याचा द्वेष करायचा काहीच अधिकार नाही हे तो जाणून असतो. त्यामुळेच त्याला क्षेत्र म्हणजे स्वत:च्या शरीराच्या मर्यादा आणि ते चालवणाऱ्या ईश्वराच्या म्हणजेच क्षेत्रज्ञाच्या अमर्याद सत्तेचा पसारा ह्याची प्रचीती येत असते. याला बाप्पा जाणणे असे म्हणतात. ते ऐकून क्षेत्रक्षेत्रज्ञविचार जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी वरेण्यराजाने बाप्पांना विचारले, हे गजानना, क्षेत्र म्हणजे काय, ते कोण जाणतो, त्याचे ज्ञान म्हणजे काय, हे करुणसागरा, तू मला सांग.
बाप्पांनी वरेण्याची उत्सुकता जाणली. करुणेचा सागर असलेले बाप्पा वरेण्याच्या विनंतीला पुढील श्लोकातून उत्तर देत आहेत
पञ्च भूतानि तन्मात्राऽ पञ्च कर्मेन्द्रियाणि च ।
अहंकारो मनो बुद्धिऽ पञ्च ज्ञानेन्द्रियाणि च ।। 21 ।।
इच्छाव्यत्तं धृतिद्वेषौ सुखदु:खे तथैव च ।
चेतनासहितश्चायं समूहऽ क्षेत्रमुच्यते ।। 22।।
अर्थ- गजानन म्हणाले, पाच महाभूते, गंध इत्यादि त्यांच्या पाच मात्रा, पाच कर्मेंद्रिये, अहंकार, मन, बुद्धि, पाच ज्ञानेंद्रिये, इच्छा, अव्यक्त, धैर्य, द्वेष, सुख, दु:ख आणि चेतना या समूहाला क्षेत्र असे म्हणतात. बाप्पांच्या सांगण्याचा सविस्तर अभ्यास आता आपण करूयात.
क्षेत्र म्हणजे आपले शरीर, हा सर्व हाडामासाचा गोळा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे. साहजिकच त्यांच्यापासून तयार झालेल्या आपल्या शरीरावर त्यांची सत्ता आहे.
आपल्याला शब्द, रस, स्पर्श, रूप आणि गंध या तनमात्रांमुळे त्या सत्तेची जाणीव होते. हात, पाय, लिंग, गुदस्थान व वाणी ही पाच कर्मेंद्रिये व कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये होत. लहान बालकांमध्ये तारुण्य जसे गुप्त असते, तसे प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या पोटात अहंकार गुप्त असतो. पंचमहाभूतांची गाठ पडली की, आकाराला आलेल्या देहाला हा अहंकार चोहोकडे नाचवतो म्हणजे मी कर्ता आहे या भावनेने कर्म करण्यास भाग पाडतो. विशेष म्हणजे हा अडाणी पुरुषांच्या मागे लागत नाही. परंतु सुशिक्षित पुरुषाचा गळा धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खायला लावतो.
अंत:करण बुद्धीच्या आधारे जीवाला सुखदु:खाची जाणीव करून देते, बुद्धीला चांगले व वाईट कळते. सांख्यांच्या सिद्धांतांमध्ये जी प्रकृति म्हणून सांगितली आहे तीच अव्यक्त आहे. परा व अपरा असे प्रकृतीचे दोन भाग आहेत. त्या पैकी परा प्रकृतीला अव्यक्त असे नाव आहे. हिला अव्यक्त म्हणायचे कारण म्हणजे पंचमहाभूते व पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे देह सूक्ष्म होऊन यात सामावलेले असतात.
क्रमश: