Maruti Chitampalli Pass Away: अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे देहावसान
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते
सोलापूर : भारतीय निसर्गवादी, वन्यजीव संरक्षक आणि प्रख्यात मराठी लेखक पद्मश्री माऊती चित्तमपल्ली यांचे सोलापुरात वयाच्या 93 व्या वर्षी बुधवारी 18 जून रोजी सायंकाळी देहावसान झाले. त्यांना त्यांच्या कार्यामुळे आणि जंगलावरील अगाध प्रेमामुळे ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जात होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, 19 रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात भावजय, दोन पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास दिल्लीला गेले होते. त्या प्रवासामुळे त्यांना कमालीचा थकवा जाणवत होता. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्न घेणे बंद केले होते. मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूर येथे झाला होता. चित्तमपल्ली यांनी कोईम्बतूर येथील स्टेट फॉ रेस्ट सर्व्हिस कॉलेजमधून शिक्षण घेतले.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या बन विभागात ३६ वर्षांहून अधिक काळ सेवा केली. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य,
नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांसारख्या विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये काम केले. वन्यजीव संरक्षणात योगदान दिले. नागझिरा, मेळघाट येथे विस्थापित बन्यजीवांसाठी अनाथाश्रम उभारण्यास त्यांनी मदत केली. त्यांना १८ भाषांचे ज्ञान होते.