महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूरमधील अरामबाई तेंगगोल समूह

06:24 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यातील उग्रवादाचे नवे नाव

Advertisement

मणिपूर सध्या समुदायांच्या आधारावर मैतेई अणि कुकी यांच्यादरम्यान विभागला गेला आहे. जानेवारी महिन्यात स्वत:ला अरामबाई तेंगगोल (हा शब्द भाला घेऊन युद्ध लढण्यासाठी जाणाऱ्या पारंपरिक अश्वारुढ सैन्यासाठी वापरला जातो) म्हणवून घेणाऱ्या एका मैतेई सतर्कता समुहाने मुख्यमंत्री एन. विरेन सिंह समवेत 37 मैतेई आमदार आणि दोन खासदारांना कांगला फोर्ट येथे बोलाविले होते, जेथे प्राचीनकाळात मैतेई साम्राज्याच्या सत्तेचे केंद्र हेते. स्वत:चे सुमारे 60 हजार स्वयंसेवक असल्याचा दावा करणारा हा समूह पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जात सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी मणिपूर आणि मैतेई हितांबद्दल स्वत:ची प्रतिबद्धता व्यक्त करावी अशी या समुहाची इच्छा होती.

Advertisement

विरेन सिंह यांनी समुहाच्या मागणीवर कुठलाच प्रतिसाद दिला नाही, परंतु दोन खासदार आणि भाजपच्या 25 आमदारांसोबत काँग्रेसचे 5, नॅशनल पीपल्स पार्टीचे 4, संजदचे 2 आणि एक अपक्ष आमदार कांगला फोर्टमध्ये पेहोचला होता. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नव्हे तर अरामबाई तेंगगोलचे सशस्त्र सदस्य तैनात होते. त्यापूर्वी सैन्यासारख्या गणवेशात असलेले काही युवक शस्त्रास्त्रांसह खुले छत असलेल्या जिप्सींमये सवार होत किल्ल्यात दाखल झाले होते. अरामबाई तेंगगोल सदस्यांनी किल्ल्यात प्रवेशापूर्वी आमदारांच्या सुरक्षारक्षकांना सोबत येण्यापासून रोखले होते.

समुहाकडून अनेक मागण्या

अरामबाई तेंगगोलच्या मागण्या लिहिण्यात आलेल्या एका वचनपत्रावर या आमदारांनी स्वाक्षरी केली आहे. यात कुकी बंडखोरांसोबतचा सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (एसओओ) करार रद्द करणे, म्यानमारच्या शरणार्थींना मिझोरममध्ये निर्वासित करणे, 1951 च्या स्थितीला आधार करत एनआरसी लागू करणे, म्यानमार सीमेवर कुंपण उभारणे आणि कुकी स्थलांतरितांना अनुसूचित जमातीच्या यादीतून हटविण्याची मागणी सामील होती. पुढील काळात मुख्यमंत्री विरेन सिंह यांनीही या वचनपत्रावर स्वाक्षरी केली ही बाब वेगळी. किल्ल्यात अरामबाई तेंगगोलच्या सदस्यांनी मणिपूर काँग्रेस अध्यक्ष के. मेघचंद्र यांच्यावर हल्ला केल्याचा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. तर कुकींच्या विरोधातील कारवाईत राज्य सरकारचे समर्थन न केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन अन्य आमदारांसोबत गैरवर्तन केल्याचा दावा करण्यात आला आहे.

परस्परांच्या विरोधात आरोप

अरामबाई तेंगगोल काही काळापासून स्वत:ची कार्यकक्षा आणि प्रभाव वाढवू पाहत आहे. खासकरून मैतेई-कुकी समुदायांमधील संघर्ष तीव्र झाल्यावर हे दिसून येत आहे. सरकारकडून डोळेझाक होत असल्याने या समुहाचे मनोबल वाढले आहे. कांगला फोर्टच्या बैठकीच्या एक दिवस आधी केंद्रीय गृह मंत्रालयाचे तीन सदस्यीय पथक या समुहासोबत चर्चा करण्यासाठी इंफाळला रवाना झाले होते, यामुळे एकप्रकारे या समुहाच्या वैधतेवर शिक्कामोर्तबच झाले होते. अरामबाई तेंगगोलचे सदस्य स्वत:च्या घरी जात असताना पूर्ण इंफाळमध्ये जमावाने त्यांचे जोरदार स्वागत केले होते. अरामबाई तेंगगोल म्यानमारमधून आलेले अवैध कुकी शरणार्थी आणि कुकी उग्रवादी समुहांवरून मैतेई समुदायामध्ये असुरक्षिततेची भावना भडकवत असल्याचे मानले जाते. राज्यात मागील 9 महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षासाठी हाच समूह जबाबदार असल्याची चर्चा आहे. तर राज्य सरकारकडून समर्थनप्राप्त सशस्त्र समूह अरामबाई तेंगगोल आमच्या समुदायाच्या विरोधात हिंसा करण्यास आघाडीवर असल्याचा आरोप कुकी नागरी समूह करत आहेत. परंतु दोन्ही गट स्वत:च्या दाव्यांकरता ठोस पुरावे सादर करण्यास अयशस्वी ठरले आहेत.

महिला समुहाकडून आव्हान

मैतेई समुदायादरम्यान अरामबाई तेंगगोलच्या वाढत्या प्रभावाला महिला सतर्कता समूह मीरा पैबी आव्हान देत आहे. या समुहाने यापूर्वी पोलीस आणि सशस्त्र दलांच्या कथित अत्याचारांसोबत अमली पदार्थ आणि मद्याच्या विरोधात अभियान राबविले आहे. मीरा पैबी समूह सुरक्षा मोहिमांमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप सशस्त्र दलांकडून केला जातो. या समुहामुळे एकदा तर 12 उग्रवाद्यांची मुक्तता करण्याची वेळ सशस्त्र दलांवर आली होती.

 

उग्रवादी गटांची जमवाजमव

स्वत:च्या समुदायात वाढती एकजूटता पाहून मणिपूरमध्ये दोन्ही गटांचे भूमिगत उग्रवादी समूह पुन्हा संघटित होऊ लागले आहेत. अलिकडच्या वर्षांमध्ये मणिपूरमध्ये स्थिती सामान्य झाल्याने उग्रवाद्यांनी जनतेमधील स्वत:चे समर्थन गमाविले होते. आता स्वत:च्या समुदायासाठी लढण्याच्या नावाखाली उग्रवाद्यांनी पुन्हा स्वत:ला संघटित केले आहे. तसेच प्रतिस्पर्धी समुदायासमवेत सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. उग्रवादी समूह आता मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल करत आहेत. म्यानमारच्या जंगलांमध्ये लपलेले उग्रवादी समूह स्वत:च्या समुदायासाठी लढण्याच्या उद्देशाने परतले आहेत आणि नागरिकांना प्रशिक्षण देखील देत असल्याचे समजते. राज्य प्रशासनाचे अस्तित्वच दिसेनासे झाल्याने राज्यासमोर पुन्हा उग्रवादाचे भूत उभे ठाकले आहे. कुकी क्षेत्रांमध्ये मणिपूर पोलीस नसल्यात जमा आहेत, तर मैतेईबहुल क्षेत्रांमध्ये केंद्रीय सशस्त्र दलांना पावले उचलणे अवघड ठरले आहे. याचमुळे लोक विविध समूह आणि उग्रवादी गटांवर भरवसा ठेवत आहेत. अशा स्थितीत शस्त्रास्त्रांची उपलब्धता समस्या आणखी तीव्र करत असल्याचे मणिपूर विद्यापीठातील एका प्राध्यापकाने म्हटले आहे.

 

पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची लूट

मे 2023 पासून जमावाने सुमारे 5682 शस्त्रास्त्रs आणि 6 लाख 50 हजार गोळ्या लुटून नेल्या आहेत, यातील केवळ 1647 शस्त्रास्त्रs आणि सुमारे 23 हजार गोळ्या 15 जानेवारीपर्यंत हस्तगत करता आल्या आहेत. उग्रवादी गट ग्रामरक्षा सेवकांच्या (व्हीडीव्ही) वेशात नागरिक आणि सुरक्षा जवानांवर हल्ले करत आहेत. व्हीडीव्ही हे नागरिकांचे असे सशस्त्र समूह आहेत, ज्यांना संघर्षादरम्यान गावांच्या सीमेवर बरॅक्सच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. उग्रवाद्यांनी आता सुरक्षादलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. 10 जानेवारी रोजी मैतेईबहुल विष्णूपूर आणि कुकीबहुल चुराचांदपूरच्या सीमेवर चार जणांच्या हत्येमागे कुकी उग्रवाद्यांचा हात होता असा दावा मैतेई नागरी समुहांनी केला आहे. तर सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांकडून या दाव्याची पुष्टी करण्यात आली आहे. या घटनेनंतर सक्रीय झालेल्या अरामबाई तेंगगोलने लोकप्रतिनिधींना बैठकीसाठी कांगला फोर्ट येथे बोलाविले होते.

 

करार रद्द करण्याची मागणी

कुकी बंडखोरांसोबतचा एसओओ करार रद्द करण्याच्या मागणीला बळ मिळण्यामागे एक मोठे कारण आहे. संबंधित करारात आत्मसमर्पण करणाऱ्या उग्रवाद्यांना ठराविक शिबिरांपुरतीच मर्यादित राहण्याचा आदेश देण्यात आला होता. कुकी उग्रवाद्यांकडून नियमित स्वरुपात या तरतुदीचे उल्लंघन केले जात असल्याचा दावा मैतेई समुहांनी केला आहे. नोव्हेंबर महिन्यात मैतेई समुदायाच्या दोन युवकांचे अपहरण आणि त्यांच्या हत्येप्रकरणी कुकी रिव्होल्युशनरी आर्मीच्या (युनायटेड) सदस्याला अटक करण्यात आली होती. मणिपूरमध्ये सतर्कता समूह उदयास येणे ते प्रभावशाली होणे आणि उग्रवादाने पुन्हा डोकं वर काढणे हे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्यात केंद्र आणि राज्य सरकारांना आलेल्या अपयशाचा परिणाम आहे. प्रशासनाने जातीय तणावावर तोडगा काढण्याऐवजी पूर्ण नियंत्रण सामुदायिक समूह आणि बंडखोराच्या हातांमध्ये सोपविले आहे. हे एका वेगळ्या प्रकारच्या अराजकतेचे चिन्ह आहे. यामुळे दोन्ही समुदायांमधील शत्रुत्व दूर होत संवादाची शक्यताच संपुष्टात येत आहे.

 

अरामबाई तेंगगोलचे स्वरुप

अरामबाई तेंगगोल 2020 पासून सक्रीय असल्याचे बोलले जाते. एक सांस्कृतकि संघटनेच्या स्वरुपात सुरुवात करत हा समूह लवकरच एक कट्टरवादी संघटनेत रुपांतरित झाला. 2022 च्या आसपास हा समूह मैतेई युवांमध्ये लोकप्रिय झाला.  मैतेई युवा आता या समुहाच्या बॅनरखाली स्वत:ला संघटित करत आहेत. राज्यसभा खासदार आणि मणिपूरचे नामधारी राजा लीशेम्बा सनाजाओबा हे या समुहाचे संस्थापक होते. सप्टेंबर 2022 मध्ये समुहाचा शपथविधी सोहळा सनाजाओबा यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. समुहाचे सदस्य काळ्या रंगाच्या टी-शर्टसोबत एक गणवेश परिधान करतात, यावर युद्धात सामील होणाऱ्या तीन घोडेस्वारांचे लाल रंगातील चिन्ह असते. सद्यकाळात या समुहाचे 50 हजार सदस्य असल्याचे मानले जाते. अरामबाई तेंगगोलचे सदस्य ‘सलाई तारेत’ ध्वज फडकवत असतात, हा ध्वज पारंपरिक 7 वंशांचे प्रतिनिधित्व करतो, जे वर्तमान मैतेई समुदाय निर्माण करण्यासाठी परस्परांमध्ये विलीन झाले होते. मैतेई समुदायाची पारंपरिक श्रद्धा सनमहिज्मला चालना देणे हे या समुहाचे प्रमुख कार्य आहे.

 

Advertisement
Next Article