Kolhapur News : अरळगुंडी ऊस आग प्रकरण! 27 शेतकऱ्यांचे पीक जळून नष्ट
हलकर्णी शेतकरी संकटात!
हलकर्णी : अरळगुंडी येथील २७ शेतकऱ्यांचा २० एकरातील ऊस आगीत जळून खाक झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर स्थानिक शेतकरी, अग्निशमन वाहने यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. पीक नजरेसमोर जळताना पाहून शेतकऱ्यासह कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दुपारी दोनच्या दरम्यान नांगनूर ते अरळगुंडी सीमेवरील वीज केंद्राशेजारी अरळगुंडीच्या हद्दीतील ऊसाला आग लागली. आग लागल्याचे समजताच शेतकरी घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. नांगनूरचे पोलीस पाटील ज्ञानदेव मोकाशी यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेला तत्काळ भ्रमणध्वनी केला.
अरळगुंडी येथे ऊसाला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे सांगितले. ग्रुपवरील सर्व जण घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्याला सुरुवात केली. दुपारी तीनच्या दरम्यान संकेश्वर येथील हिरा शुगर कारखाना, गडहिंग्लज नगरपालिका, अकस कंपनी हत्तरगी या ठिकाणाहून अग्निशमन नेला ऊस, दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी आग नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. वेगाचा वारा असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. तब्बल तीन तास अग्नितांडव सुरू होते.
मंडळ अधिकारी प्रवीण कदम यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली व पंचनामा केला. या घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांत जयसिंग जाधव, सुभाष जाधव, रवींद्र पाटील, राजश्री हंचनाळे, दीपक हंचनाळे, शशिकांत हुक्केरी, अशोक हुक्केरी, शिवानंद गुंडाळे, मल्लाप्पा गुंडाळे, राजू गुंडाळे, उमेश गोणी, शंकर गोणी, मारुती गोणी, परगोंडा पाटील, बसगोंडा पाटील, बसवराज वाळकी, आनंदा पाटील, बसवाणी नार्वेकर, शिवानंद वाळकी, शंकर वाळकी, अण्णाप्पा गोणी, कार्तिक हंचनाळे, मलगोंडा पाटील, राजाराम वाळकी, बापूसो पाटील, आण्णासो पाटील, रावसो पाटील यांचा समावेश आहे. आगीत जळालेल्या ऊसाची कारखान्यांनी तत्काळ उचल करावी. आगीमध्ये नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे शासनाने ठोस मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.