Satara Accident: वराडे हद्दीत मालट्रक पलटी होऊन अपघात, सुदैवाने दोघेजण बचावले
गेल्या काही महिन्यात वारंवार ट्रक व इतर वाहने पलटी झाल्याने अपघात सुरुच
उंब्रज : वराडे (ता. कराड) येथे चुकीच्या पद्धतीने दिलेल्या डायव्हर्जनमुळे वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथे मालट्रक पलटी झाला. सुदैवाने यातून दोघेजण बचावले आहेत. गेल्या काही महिन्यात येथे वारंवार ट्रक व इतर वाहने पलटी झाल्याने अपघातांची मालिकाच सुरुच आहे.
अपघातानंतर ट्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला केली जातात. मात्र येथील ड्रायव्हर्जन योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टीने संबंधितांकडून उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे (ता. कराड) गावच्या पुणे ते कोल्हापूर जाणाऱ्या लेनवर १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डायव्हर्शन मालट्रक पलटी झाला. यामध्ये दोघेजण सुदैवाने बचावले असली तरी मालट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
रुंदीकरणाच्या कामासाठी वराडे हद्दीत हॉटेल कोळीवाडासमोर डायव्हर्शन देण्यात आले आहे. वराडे हद्दीत नव्या टोल नाका उभारण्याचे काम घाईगडबडीत पूर्ण करुन टोलवसुली सुरू करण्यात आली. मात्र टोलनाक्यासमोर वराडे हद्दीत चुकीचे पध्दतीने दिलेले ड्रायव्हर्जन जीवघेणे ठरत असून अनेक अपघात झालेत. या परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे.
डायव्हर्जनमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मालट्रक पलटी होणे, वाहने एकमेकांवर आदळून अपघात होणे या घटना अनेकदा घडल्या आहेत. येथे ठेवण्यात आलेला सिमेंटच्या ठोकळ्यावर वाहने आदळून पलटी झाली आहेत. वाहने ट्रेनच्या साह्याने बाजूला काढली जातात यासाठी संबंधित ट्रक चालक, वाहनधारकांना हजार रुपयांचा खर्च येतो.
वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. मात्र परिस्थिती डोळ्यासमोर असूनही संबंधित विभागाकडून येथे अद्याप डायव्हर्शन हटवण्यात आलेले नाहीत. तसेच रस्त्याचे उर्वरित काम मंद गतीने चालू आहे. त्यामुळे अपघातांची मालिका सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रस्त्यावर उभी राहतात वाहने
वराडे हद्दीत झालेल्या नव्या टोलनाक्यासमोर मोठ्या प्रमाणावर वाहने थांबतात. येथे असणाऱ्या हॉटेल ढाब्यावर जेवण, चहा नाष्टा साठी कंटेनर, मालट्रकपासून सर्व प्रकारची वाहने थांबतात. हॉटेल ढाब्यांवर पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे वाहतूकीची कोडीं निर्माण होते. इतर वाहनधारकांना थांबलेल्या गाड्यांमधून रस्ता शोधून पुढे जावे लागते. त्यामुळे पार्किंगची सोय नसणाऱ्या हॉटेल ढाब्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.