Sangali News: राज्य मार्ग रस्त्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर
जनसुराज्यचे समित कदम यांची माहिती
मिरज : तालुक्यातील करोली एम-पाटगांव-सिध्देवाडी-गुंडेवाडी-लिंगनूर-खटाव ते राज्य मार्ग रस्त्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी पत्रकारांना दिली. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या डांबरीकरणाची या भागातील नागरिकांची मागणी होती. त्यास मंजूरी मिळाली असून, नऊ किलो मिटरच्या या रस्ता कामाला लवकरच सुरूवात होईल, असेही कदम म्हणाले.
मिरज तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील काही रस्त्यांच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यामध्ये करोली एम-पाटगांव-सिध्देवाडी-गुंडेवाडी-लिंगनूर-खटाव ते राज्य मार्ग या रस्त्याचा प्रामुख्याने समावेश होता. या रस्त्याच्या डांबरीकरणाने या भागातील शेतीसह पूरक व्यवसायाला प्राधान्य मिळणार आहे.
पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय होत असल्याने शेतकऱ्यांसह येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळकरी विद्यार्थ्यांना तर दररोज तारेवरची कसरत करावी लागत होती. रस्त्याची रुंदी वाढविण्याबरोबर खडीकरण, डांबरीकरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. त्यामुळे केंद्रीय मार्ग निधीकडे यासह तालुक्यातील काही रस्त्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
सदर रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
त्यांच्या सहकार्यानेच सुमारे नऊ कि.मी. रस्त्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला असून, सध्यस्थितीला ३.७५ मिटर रुंदीचा असलेला रस्ता आता ५.५ मिटर केला जाणार आहे, असेही समित कदम म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. महादेव कुरणे, सोनीचे अरविंद पाटील, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, डॉ. पंकज म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रविण घेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.