सावंतवाडीत नवांगुळ यांच्या मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलला मंजूरी द्या
अमोल टेंबकर;महात्मा फुले आरोग्य योजनेतून होणार गोरगरीबांना होणार फायदा
सावंतवाडी । प्रतिनिधी
आपत्कालीन परिस्थितीत गोवा बांबुळी किंवा कोल्हापुर-बेळगावला धावणा-या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील लोकांची आरोग्याची मागणी लक्षात घेता शासनाच्या लालफितीत तब्बल सात वर्षे अडकलेल्या यशराज मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलला महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी मंजूरी द्या जेणेकरून त्यांना मोफत उपचार मिळण्यास मदत होईल. यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणी दीपक केसरकर यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंबकर यांनी आज येथे केली.दरम्यान, सावंतवाडीत होणा-या शासकीय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आमचा विरोध नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधी विरोधात नाराजी नाही. परंतू , गोवा बांबुळीची पायपीट थांबविण्यासाठी रूग्णांची गरज ओळखून हा प्रश्न तातडीने सोडवला जावा अशी कळकळीची विनंती त्यांनी उपस्थित मित्रमंडळाच्या माध्यमातून केली.अमोल टेंबकर मित्रमंडळाच्या माध्यमातून सावंतवाडीकरांचा आरोग्याचा प्रश्न सुटावा यासाठी आज येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शरद पवार राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षा सौ. सावली पाटकर, उपरकर समर्थक आशिष सुभेदार, ठाकरे शिवसेनेचे प्रविण गवस, सामाजिक बांधीलकीचे रवी जाधव, युवा कार्यकर्ते हेमंत पांगम, साहिल सावंत, शुभम केदार, सचिन मोरजकर, आनंद काष्टे, बबन डिसोझा, प्रशांत मोरजकर, साई राणे, अॅन्टोनी डिसोझा आदी उपस्थित होते.यावेळी श्री.टेंबकर पुढे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आरोग्याच्या कोणत्याही सोई नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक प्रसंगी गोवा-बांबुळी किंवा कोल्हापुर-बेळगाव येथे रुग्णांना जावे लागते. या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जागेचा वाद असल्यामुळे हा प्रश्न अनेक दिवस रेंगाळला आहे. मात्र वाद सुटला तरी किमान तीन वर्षे तरी हॉस्पिटल उभारणीसाठी लागणार आहेत. त्यामुळे तुर्तास येथील रुग्णांची गरज लक्षात घेता सर्वसोईंनी युक्त असलेले तसेच मुंबई-गोवा महामार्गावर असलेले यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलयासाठी पर्याय ठरु शकते. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी त्यांनी केली आहे. तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी येण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला महात्मा फुले योजनेचा प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. मात्र शासनस्तरावर ऑडीट होवून सुध्दा अद्याप पर्यंत या हॉस्पिटलाला शासकीय मंजूरी मिळालेली नाही. मात्र ही मंजूरी मिळाल्यास सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यातील रुग्णांना याठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे.दरम्यान प्रत्येक तालुक्यात एक हॉस्पिटल असावे, असा मंत्रीमंडळाचा नियम झालेला आहे. मात्र मतदार संघातील तीन ही तालुक्यात या योजनेखाली सेवा देणारे हॉस्पिटल नाही. उलट कणकवलीत चार आणि कुडाळ मध्ये दोन हॉस्पिटल कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या भावनेचा आदर करुन हा प्रश्न पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावावा. अन्यथा आम्ही पुढील आंदोलनात्मक भूमिका घेवू, असे टेंबकर म्हणाले.यावेळी टेंबकर यांनी सावंतवाडीच्या आरोग्य प्रश्नावरुन घेतलेली भूमिका योग्य आहे आणि हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असे श्री. साळगावकर व सांगेलकर यांनी सांगितले तर कुटीर रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे बांबुळीला पाठवले जाते. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो, असे श्री. जाधव म्हणाले.
दहा तज्ञ डॉक्टरांकडून पाच ते सहा प्रकारच्या मोफत सर्जरी होणार...
यावेळी टेंबकर म्हणाले या ठिकाणी संबंधित नवांगुळ यांच्या हॉस्पिटलला शासकीय परवानगी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जनरल सर्जरी,युरो सर्जरी, स्त्रीरोग लॅप्रोस्कोपी सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया, कॅन्सरची शस्त्रक्रिया, डोळ्यांचे शस्त्रक्रिया होणार आहे यासाठी रेवण खटावकर,योगेश नवांगुळ देवेंद्र होशिंग,सौरभ गांधी, सागर कोल्हे,नेहा सावंत आदी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून त्या ठिकाणी सेवा देणार आहेत त्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा मोफत लाभ मिळणार आहे