हिंदुस्थान युनिलिव्हरकडून आईस्क्रिम व्यवसाय वेगळा करण्याला मान्यता
संचालक मंडळ राजी : आईस्क्रिम व्यवसाय वाढीसाठी होणार प्रयत्न
नवी दिल्ली :
हिंदुस्थान युनिलिव्हर लि. यांच्या संचालक मंडळाने कंपनीच्या आईस्क्रिम व्यवसायाला स्वतंत्रपणे वेगळा करण्याला मंजुरी दिली आहे. पुढील काळामध्ये संस्थेचा आईस्क्रिम व्यवसाय वेगळा करण्यासंदर्भातील प्रक्रियेला वेग दिला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हरच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते वरील ठरावाला मंजुरी देण्यात आली. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत आईस्क्रिम व्यवसाय कायदेशीर मार्गाने वेगळा केला जाण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार आहे. भारतातील सर्वात आघाडीवरची अशी एफएमसीजी कंपनी म्हणून हिंदुस्थान युनिलिव्हरचा उल्लेख केला जातो. सेमवारी कंपनीचा समभाग 1.2 टक्के वाढत 2474 रुपयांवर एनएसईवर पोहोचला होता.
जागतिक ब्रँडमध्ये टॉप दहात
जागतिक स्तरावर पाहता युनिलिव्हरच्या आईस्क्रिमचा व्यवसाय आघाडीवरच्या 10 ब्रँडमध्ये गणला जातो. यामध्ये क्वालिटी वॉल, मॅग्नम आणि बेन अँड जेरी यांचाही समावेश आहे. या ब्रँडस्च्या माध्यमातून 2023 मध्ये 7.9 पौंड अब्जची उलाढाल झाली असल्याचे समजते. यावर्षी मार्च महिन्यामध्ये लंडनमधील सहकारी कंपनी युनिलिव्हरने आईस्क्रिम व्यवसाय वेगळा करण्याबाबत निर्णय घेतला होता. स्वतंत्रपणे व्यवसाय वाढवण्यासोबत जाळे विस्तारण्यासाठी पावले उचलली जातील.