जगातील पहिल्या चिकनगुनिया लसीला मान्यता
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जगातील पहिल्या चिकनगुनिया लसीला मान्यता दिली आहे. चिकनगुनियाची पहिली लस 10 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आली असून त्याला इक्षिक (घ्xम्प्ग्)ि असे नाव देण्यात आले आहे. सदर लस 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी दिली जाऊ शकते. एफडीएच्या मते, लसीचा फक्त एक डोस द्यावा लागेल. ही लस चिकनगुनियाशी लढण्यासाठी प्रभावी ठरेल, असे एफडीएच्या सेंटर फॉर बायोलॉजिक्स इव्हॅल्युएशन अँड रिसर्चचे संचालक पीटर मार्क्स यांनी स्पष्ट केले आहे. ‘वलनेवा’ या फ्रेंच बायोटेक कंपनीने इक्षिक (Ixchiq) ही लस विकसित केली आहे. चिकनगुनियाचा विषाणू प्रामुख्याने संक्रमित डासांच्या चाव्याद्वारे लोकांमध्ये पसरतो. गेल्या 15 वर्षात चिकनगुनिया विषाणू संसर्गाची किमान 50 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चिकनगुनिया संसर्गाचा सर्वाधिक धोका आफ्रिका, आग्नेय आशिया आणि अमेरिका खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये दिसून येतो.