नेव्हिगेशन प्रणालीच्या खरेदीला मंजुरी
संरक्षण खरेदी परिषदेची पार पडली बैठक : तटरक्षक दलाचे बळ वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेची (डीएसी) महत्त्वाची बैठक सोमवारी नवी दिल्लीत आयोजित झाली आहे. या बैठकीत भारतीय सैन्यासाठी चिलखती वाहने आणि 22 इंटरसेप्टर नौकांसाठी नेव्हिगेशन प्रणालीच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे. परंतु नेव्हिगेशन प्रणाली आणि 22 इंटरसेप्टर नौकांच्या खरेदी मूल्याचा खुलासा झालेला नाही.
भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढविण्यासाठी डीएसीने अत्याधुनिक प्रणालीसोबत 22 इंटरसेप्टर नौकांच्या खरेदीसाठी मंजुरी प्रदान केली. या नौकांचा वापर किनारी देखरेख, गस्त, शोध आणि बचावकार्यांसाठी केला जाणार आहे. हे उपकरण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून भारतीय-स्वदेशी स्वरुपात डिझाइन, विकसित आणि निर्मित श्रेणीच्या अंतर्गत खरेदी करण्यात येणार आहे.
स्पूफ-प्रूफ नेव्हिगेशन प्रणाली
संरक्षण खरेदी परिषदेने सैन्याच्या वाढत्या गरजा पाहता चिलखती लढाऊ विमानांसाठी (एएफवी) अत्याधुनिक भूमी नेव्हिगेशन सिस्टीमच्या (एएलएनएस) आवश्यकतेच्या आधारावर खरेदीला मंजुरी दिली आहे. तर भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमता वाढविण्यासाठी डीएसीने सक्षम अत्याधुनिक प्रणालीयुक्त 22 इंटरसेप्टर नौकांच्या खरेदीसाठी मंजुरी प्रदान केली. ही प्रणाली उच्चस्तराच्या एन्क्रिप्शनसोबत स्पूफ-प्रूफ आहे.