Sangli : नियोजन कामाची मान्यता 31 ऑक्टोबर'पर्यंत द्या ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ३१ ऑक्टोबरपर्यंत डेडलाईन
सांगली : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत कार्यान्वयीन यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी घेतला. या समितीमधून करण्यात येणाऱ्या विकासकामांची प्रशासकीय मान्यता सप्टेंबरमध्ये देण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. परंतु कार्यवाहीच झाली नसल्याने पालकमंत्र्यांनी यासाठी आता ३१ ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, यांच्यासह विविध राज्यस्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
सन २०२५-२६ च्या प्रशासकीय मान्यताप्राप्त कामे सुरू करण्याचे आदेश देऊन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनांतर्गत कामांना, योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत होती. त्याला एक महिना मुदतवाढ मिळून जिल्हा बार्षिक योजनांतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रातील योजनांतर्गत जिल्हास्तरीय कामांकरिता तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे उर्वरित अवधी पाहता व तसेच सुटीचा कालावधी लक्षात घेता सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही गतीने करावी. यासाठी पाठपुरावा करावा, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा बार्षिक योजनांतर्गत जिल्ह्यातील विविध राज्यस्तरीय कार्यान्वयीन यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलीस दल, महानगरपालिका व नगरपालिका यांच्या कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची सद्यस्थिती, अर्थसंकल्पिय तरतूद आदिंचा आढावा घेतला.
जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्यातील राज्यस्तर यंत्रणा, जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभाग, महानगरपालिका आदिंसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.