For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इंडिया एनर्जी वीक’ साठी हॅलिपॅड, तरंगत्या जेटीस मंजुरी

12:07 PM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इंडिया एनर्जी वीक’ साठी हॅलिपॅड  तरंगत्या जेटीस मंजुरी
Advertisement

6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान किटल बेतूल येथे महोत्सव : पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता

Advertisement

पणजी : पुढील महिन्यात गोव्यात होणाऱ्या इंडिया एनर्जी वीक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने किटल बेतूल येथे हॅलिपॅड बांधण्यास गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, पेट्रोलियम आणि पर्यावरण व्यवस्थापन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केपे तालुक्यातील किटल येथे 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे. या सप्ताहात जगभरातील 100 हून अधिक देशांमधून सुमारे 35 हजार प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यात खास करून ऊर्जा स्पेक्ट्रममधील प्रभावशाली निर्णयकर्त्यांचा समावेश असेल. पंतप्रधानांना उतरण्यासाठी सुमारे 12,100 चौरस मीटर क्षेत्रफळात काँक्रिट प्लॅटफॉर्मसह हॅलिपॅड असेल. त्याशिवाय पाहुण्यांच्या व्यवस्थेसाठी तात्पुरते बहुउद्देशीय सभागृह, व्याख्यान सभागृह तसेच तरंगती जेटी बांधण्यासही प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

किटल येथे यापूर्वी भारतातील पेट्रोलियम उद्योगांसाठी सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने 1990 मध्ये 1.3 लाख चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आली होती. त्यानंतर याच जागेत डिफेन्स एक्स्पो आयोजित करण्यात आला होता. आता तेथेच इंडिया एनर्जी वीक आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 4,000 चौरस मीटर क्षेत्रफळात डिजिटल एक्स्पो सेंटर आणि बांधकामे उभारण्यात येणार आहेत. प्राधिकरणाने तेथे तरंगती जेटी आणि कनेक्टिंग वॉकवे रॅम्प बांधण्यासही मान्यता दिली आहे. हा रॅम्प अंशत: जमिनीवर आणि उर्वरित समुद्रात असलेल्या ’समुद्र शिक्षा’ बार्जला जोडण्यात येईल. दरम्यान, सदर बांधकामे करण्यासाठी प्राधिकरणाने काही अटीही घातल्या आहेत. त्यानुसार प्रस्तावित क्षेत्राचा काही भाग आंतरभरती अर्थात संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने तेथे कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करता येणार नाही. समुद्रात कोणताही पक्का पाया किंवा पायलिंग करता येणार नाही. तसेच बांधकामासाठी कोणतीही अवजड यंत्रसामग्रीही वापरता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व पायाभूत सुविधा उभारताना तेथील पाण्याचा प्रवाह बदलला किंवा वळवला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.