कॅन्टोन्मेंटमध्ये नव्या मटण-बिफ मार्केटला मंजुरी
बोर्डच्या मासिक सभेत कामांना चालना : खुल्या जागांमधून महसूल वाढीचा प्रयत्न
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये नव्या मटण व बिफ मार्केटला मंगळवारी कॅन्टोन्मेंट बोर्डने मंजुरी दिली. जुने मार्केट पूर्णपणे खराब झाले असून ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे बरेच दुकानगाळे रिक्त आहेत. यासाठी नवीन मार्केटची मागणी होत होती. त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डची जागा वापरून कॅम्प कसाब जमात वेल्फेअर सोसायटीतर्फे नवे मटण व बिफ मार्केट बांधले जाणार असून यातून कॅन्टोन्मेंटला महसूलही मिळणार आहे. मंगळवारी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डची मासिक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बिफ व मटण मार्केट सुरू करण्याबरोबरच महसूल वाढीसंदर्भात काही कामांना मंजुरी देण्यात आली. कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला सीईओ राजीवकुमार, आमदार राजू सेठ व नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते. नव्या मार्केटमध्ये 12 मटण शॉप तर 18 बिफ शॉप्स असणार आहेत. पाच वर्षांसाठी संबंधित जागा वापराकरिता वेल्फेअर सोसायटीकडे दिली जाणार आहे. या जागेमध्ये तात्पुरत्या स्वरुपातील मार्केट उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
निकृष्ट खाद्यपदार्थांवर कारवाई
कॅन्टोन्मेंट बोर्डने मागील काही महिन्यांत अन्न सुरक्षेबाबत कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कॅम्पमधील काही बेकरी व खाद्यपदार्थांच्या स्टॉलची पाहणी करण्यात आली. यामध्ये अस्वच्छता व खाद्यपदार्थांवर बुरशी आलेली दिसून आल्याने संबंधितांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना डेसकोड केला जाणार आहे. त्याचबरोबर चित्रकला विषयासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. मुख्य पोस्ट कार्यालय परिसरात रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने सुलभ शौचालयाची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आता चित्रीकरणासाठी पैसे मोजावे लागणार
कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक जुने बंगले आहेत. या बंगल्यांमध्ये चित्रपट, मालिका, लघुपटांचे चित्रीकरण करण्यात येत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने आता चित्रीकरणासाठी प्रतिदिन शुल्क निश्चिती केली आहे. त्यामुळे यापुढे चित्रीकरणासाठी कॅन्टोन्मेंटची परवानगी घेऊन शुल्क भरावे लागणार आहे.