नऊ जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या औद्योगिक कॉरिडॉरला संमती
कुमारस्वामींना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे पत्र
बेंगळूर : राज्यातील 9 जिल्ह्यांच्या समावेश असणारे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर (एनआयसीडीपी) विकसित करण्याची योजना जारी करण्यास केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता. या योजनेची अंमलबजावणी करण्याची विनंतीही केली होती. आता मंत्री पियुष गोयल यांनी कुमारस्वामी यांना पत्र पाठवून योजनेला संमती देत असल्याची माहिती दिली आहे. एनआयसीडीपी हा व्यापक असून त्यामध्ये मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, कोलार, हासन, मंगळूर हुबळी धारवाड, रायचूर आणि बिदर जिल्ह्यांचा समावेश आहे. 13 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पियुष गोयल यांची भेट घेऊन राष्ट्रीय औद्योगिक
कॉरिडॉर योजनेसंबंधी चर्चा केली तसेच त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली होती. सदर कॉरिडॉरच्या रचनेमुळे राज्यभर औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल तसेच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढतील, अशी माहिती कुमारस्वामींनी गोयल यांना दिली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी अनेक पूरक संसाधने, वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहेत. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास साध्य करण्याची ही संधी आहे. त्याचप्रमाणे, राज्यात समतोल प्रादेशिक विकास शक्य होईल, याची जाणीवही कुमारस्वामी यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना करून दिली होती. कुमारस्वामींच्या प्रस्तावानुसार साधकबाधक मुद्द्यांवर पियुष गोयल यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कर्नाटकच्या विकासासाठी एक परिवर्तनकारी संकल्पना म्हणून राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर योजनेची प्रशंसा केली आहे. ही योजना केंद्राच्या रचनात्मक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी अनुकूल आहे. याद्वारे, राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहती निर्माण करण्याचे कुमारस्वामींचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे.