फरार मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी
बेल्जियममधील न्यायालयाचा निर्णय : 13,850 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी
वृत्तसंस्था/ अँटवर्प
बेल्जियममधील अँटवर्प येथील न्यायालयाने शुक्रवारी भारतातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. भारतीय एजन्सींच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोक्सीची केलेली अटक वैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तथापि, चोक्सीला अजूनही उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे. त्याने अपील केले नाही किंवा अपील फेटाळले गेले तर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया पुढे सुरू राहील. चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून 13,850 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
बेल्जियम पोलिसांनी भारतीय तपास एजन्सींच्या विनंतीवरून पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला 12 एप्रिल रोजी अटक केली होती. तो सध्या तुरुंगात आहे. अटकेवेळी मेहुल चोक्सी बेल्जियममधून स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. चोक्सीला अटक करताना पोलिसांनी मुंबई न्यायालयाने 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा संदर्भ पुढे केला होता.
मेहुल चोक्सी सध्या त्याची पत्नी प्रीतीसोबत राहत होता. त्याच्याकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. 2018 मध्ये भारत सोडण्यापूर्वी चोक्सीने 2017 मध्येच अँटिग्वा-बार्बुडाचेही नागरिकत्व मिळवले होते. चोक्सीने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत सुनावणीसाठी भारतात हजर राहण्यास वारंवार नकार दिला. काही वेळेस त्याची हजेरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. भारतातील त्याच्या अनेक मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
