Sangli : सांगली जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; महायुतीत वाद !
जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वावरून महायुतीत तणाव
सांगली : सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीमधील पक्ष नेत्यांच्या शिफारशीनुसार सदस्यांच्या नियुक्त्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे जूनमध्येच मंजूरीसाठी पाठवला आहे. या सदस्यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजनमधील निधीही मंजूर करण्यात आला आहे. परंतु त्यांचे सदस्यत्वच रखडल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. सत्तेत समान सदस्यत्वासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मंजुरी अडवून ठेवल्याची चर्चा आहे.
सदस्यत्व मंजूरीसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील नावे संबंधितांना माहिती आहेत. यापुर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार खासदारांच्या मांडीला मांडी लावून हे सदस्य उपस्थितही होते. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे या सदस्यांच्या शिफारशीनुसार सुचवण्यात आलेली कामेही पाठवली आहेत.
त्या कामांचा पाठपुरावा करणाऱ्या सदस्यामुळे जिल्हा नियोजनचे अधिकारीही त्रस्त झाले असल्याचे चित्र आहे. त्यांची अवस्था सहन होईना आणि सांगता येईना अशी झाली आहे. तर नियुक्त्या रखडल्याने सबंधित सदस्यांमध्येही नाराजी पसरली आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये शिवसेनेचे खा. धैर्यशिल माने आणि भाजपाचे जतचे आ. गोपीचंद पडळकर यांची अधिनियमाच्या कलम ३ (३) दोन (ब) नुसार राज्य विधीमंडळ आणि संसद सदस्यामधून जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित करण्यात आले आहे.
याशिवाय अकरा सदस्यांमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, जिल्हा परिषदेचे माजी संग्राम देशमुख, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे, आणि माजी नगरसेविका भारती दिगडे, यांची नावे आहेत. तर शिवसेनेतर्फे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि आटपाडीचे तानाजी पाटील, तर राष्ट्रबादी अजित पवार गटातर्फे प्रा. पद्माकर जगदाळे आणि निशिकांत पाटील यांची नावे आहेत.
याशिवाय जनसुराज्य, रयत क्रांती आणि आरपीआय तर्फे समित कदम, अमोल पाटील आणि राजेंद्र खरात यांना जिल्हा नियोजन समितीवर संधी देण्यात आली आहे. नेत्यांच्या वादात कार्यकर्त्याची फरफट नको अशी मागणी होत असून तात्काळ जिल्हा नियोजनची यादी मंजूर करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
२५ जून रोजी होणार होती घोषणा
जिल्हा नियोजन समितीमधील नावांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतू ती नावे आता लपूनही राहिली नाहीत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील २५ जून रोजी या नावांची घोषणा करतील असे सांगण्यात येत होते. परंतु आता चार महिने झाले तरीही यादीच मंजूर नसल्याने नाराजी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला आणखी एक जागा हवी असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांना दोन ऐवजी तीन जागांची मागणी आहे. तर आमचे संख्याबळ जास्त असल्याने अकरा पैकी सहा जागावर आमचा दावा आहे. परंतु घटक पक्षांवर अन्याय नको म्हणून त्यांनाही प्रत्येकी एक जागा देण्यात आल्याचे भाजपाचे मत आहे. परंतु घटक पक्षांना देण्यात आलेल्या जागा या भाजपच्या कोट्यातील समजण्यात याव्यात असा युक्तीवाद राष्ट्रवादीने केल्याने वादात मंजुरी रखडली असल्याची चर्चा आहे.