आमदारांची महामंडळांवर नियुक्ती
लोबो, संकल्प आमोणकरांची मंत्रिपदाची संधी हुकली
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने काल गुऊवारी आजी-माजी आमदारांची सरकारच्या विविध महामंडळांवर वर्णी लावली. सरकारच्या या निर्णयामुळे संभाव्य मंत्रिपदाची आस धरून राहिलेल्या आमदारांना आता महामंडळांवरच समाधान मानावे लागणार आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनाही महामंडळावर नियुक्त केल्याने तूर्तास तरी मंत्रिमंडळ फेररचना होण्याची शक्यता धूसर बनली आहे.
मायकल लोबो यांचे मंत्रिपद हुकले
भाजप सरकारातील ज्येष्ठ नेते तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे हल्लीच निधन झाल्याने एक मंत्रिपद रिक्त झाले आहे. ते कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना मिळणार अशी शक्यता राजकीय तज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र आता गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्षपद लोबो यांना देण्यात आल्याने लोबो यांची मंत्रिपदावरील नियुक्ती तूर्तास हुकली आहे.
मंत्रिपदाची लॉटरी कुणाला?
रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेले मंत्रिपद कुणालाही देण्यात आलेले नाही, त्यामुळे या मंत्रिपदाची लॉटरी कोणाला, कधी मिळणार? हा विषय सध्या चर्चेत आहे. रिक्त असलेल्या मंत्रिपदावर कोणाला नेमायचे हा निर्णय फोंड्यात पोटनिवडणूक झाल्यानंतरच घ्यायचा, असे भाजपने ठरवले आहे.