For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भ्रष्टाचार चौकशीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांची नेमणूक

10:54 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
भ्रष्टाचार चौकशीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांची नेमणूक
Advertisement

होनगा ग्रामस्थांमधून आश्चर्य : ता. पं.च्या कारभारावर संशय : ग्रा. पं. पीडीओ, सचिवांची पाठराखण केल्याचा आरोप

Advertisement

सावळा गोंधळ...

  • पंचायतराज खात्याशी संबंध नसणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केल्याने आश्चर्य
  • तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह
  • पीडीओ, सेक्रेटरी यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची जि. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

बेळगाव : होनगा ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी चक्क गटशिक्षणाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पंचायतराज खात्याशी संबंध नसणाऱ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेमणूक करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या गलथान कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. होनगा ग्राम पंचायत विकास अधिकारी सुमित्रा मिरजी, सचिव मलप्रभा कणबर्गी यांनी संगणक उतारा वितरणात मोठा भ्रष्टाचार केला आहे. तर अध्यक्षांना थांगपत्ता न लागता रोजगार हमी योजनेतून 2 लाख 70 हजाराच्या निधीचा गैरकारभार केला आहे, असा आरोप करत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य विजय होनमनी यांनी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. होनगा ग्राम पंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या विकास अधिकारी सुमित्रा मिर्जी आणि व्दितीय सचिव मलप्रभा कणबर्गी यांच्या गलथान कारभारामुळे ग्राम पंचायतीला मोठा फटका बसला आहे. याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

Advertisement

ऑगस्ट 2023 रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याची दखल घेऊन तत्कालीन जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी तक्रारीची चौकशी करण्यासाठी तालुका पंचायतीला सूचना केली होती. यावरुन तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामीण शिक्षणाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. याबाबतचा आदेश दि. 26 डिसेंबर 2023 रोजी जारी केला आहे. मात्र अद्यापही याची कोणतीच चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भ्रष्टाचाराला वरिष्ठांकडूनच कृपाशिर्वाद मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ग्राम पंचायतीमध्ये संगणक उतारा वितरण करण्यासाठी नियमानुसार 50 रुपये शुल्क असताना अधिकाऱ्यांकडून भरमसाठ लूट केली जात आहे. नियम धाब्यावर बसवून संगणक उतारे वितरण करण्यात आले आहेत. सदर उतारे काही दिवसानंतर पुन्हा डिलीट करण्यात आले आहेत. यामुळे पैसे खर्च करून संगणक उतारे घेतलेल्या नागरिकांना पुन्हा उतारे मिळेनासे झाले आहेत. गैरकारभारावर पडदा टाकण्यासाठी विकास अधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आला आहे.

तर रोजगार हमी योजनेतून राबविण्यात आलेल्या विकास कामांचे बिल अदा करताना 2 लाख 70 हजार निधींचा गैरवापर करण्यात आला आहे. अध्यक्षांच्या सहीविना निधी काढण्यात आला आहे. याबाबत अध्यक्ष होनमनी यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असली तरीसुध्दा कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. होनगा ग्राम पंचायतींच्या व्याप्तीत येणाऱ्या औद्योगिक वसहतींमधून मोठ्या प्रमाणात कर जमा होतो. यामध्येही गैरकारभार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. उलट गैरकारभाराच्या चौकशीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पंचायतराज खात्याची माहिती नसणाऱ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडून केलेली नेमणूक संशयाला कारण ठरत आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी विजय होनमनी यांनी केली आहे.

तालुका पंचायतीचा गैरकारभार चव्हाट्यावर

तक्रार दाखल केलेल्या होनगा ग्रा. पं. सदस्य विजय होनमनी यांना सूचना करण्यासाठी तालुका पंचायतीकडून पोस्टव्दारे पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र सदर पत्र त्यांच्या नावाऐवजी बसवराज अप्पय्या नाईक (रा. जनता कॉलनी, बंबरगा) यांच्या नावे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तालुका पंचायत अधिकाऱ्यांच्या या गैरकारभाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. संबंधितांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होनमनी यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.