अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक पारदर्शकपणे व्हावी
महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची विकास आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा
बेळगाव : अंगणवाडी कार्यकर्त्या, साहाय्यिकांच्या नेमणुकीत दबाव किंवा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. नेमणूक पारदर्शकपणे करण्यात यावी. यामध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला. बेळगावात मंगळवारी महिला व बालकल्याण खात्याच्या विभागस्तरीय विकास आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. गुणवत्तेच्या आधारावर अंगणवाड्यांवर नेमणूक होत असते. यामध्ये आपला हस्तक्षेप असणार नाही. तसेच कोणीही दबावाखाली येऊन काम करू नये.
अंगणवाडी योजना सुरू होऊन 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. 80 टक्के अंगणवाड्या खासगी नर्सरीपेक्षा उत्तमरितीने चालत आहेत. अंगणवाड्यांमधून मुलांना सर्व सुविधा मिळत आहेत. अंगणवाड्यांमध्ये मुलांना दाखल करून घेण्यासाठी गल्लीगल्लीतून प्रचार झाला पाहिजे. पालकांचे मन परिवर्तन करून मुलांना अंगणवाडीत दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अधिकाऱ्यांना सूचना केली. सक्षम योजनेंतर्गत विशेष प्रयत्न करून राज्यात 17,500 अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने कर्नाटकातील महिला व बालकल्याण खाते इतर राज्यांना आदर्शवत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खात्यातील अधिकाऱ्यांनी यापुढेही जबाबदारीने व कर्तव्यदक्षपणे कार्य करावे, असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले. महिला व बालकल्याण खात्याच्या मुख्य सचिव डॉ. शामला इक्बाल, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महिला व बालकल्याण खात्याचे संचालक महेशबाबू, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याचे संचालक राघवेंद्र यांसह अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कामात कसूर खपवून घेणार नाही
अंगणवाडी इमारतींचे भाडे, मुलांना अंडी वाटप करण्यासाठी अनुदानाचा अभाव नाही. अधिकाऱ्यांनी अनुदान वेळेत उपलब्ध करून द्यावे, प्रत्येक महिन्याला पाहणी करावी. खात्याची कामे सुरळीतपणे व्हावीत, त्यामध्ये सुधारणाही व्हावी. कामात कसूर केल्यास खपवून घेतला जाणार नाही, असेही मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या.