For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वोच्च न्यायालयात आणखी 2 न्यायाधीशांची नियुक्ती

06:42 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वोच्च न्यायालयात आणखी 2 न्यायाधीशांची नियुक्ती
Advertisement

कोटिश्वर सिंह, आर. महादेवन यांच्या नावाची शिफारस मंजूर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवीदिल्ली

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी दोन नव्या न्यायाधीशांच्या नावांची अधिसूचना मंगळवारी जारी केली आहे. या नावांमध्ये जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. कोटिश्वर सिंह आणि मद्रास उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आर. महादेवन यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 11 जुलै रोजी केंद्र सरकारला दोन्ही न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली होती. या दोघांनी शपथ घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयात निर्धारित न्यायाधीशांची  34 ही संख्या पूर्ण होईल आणि सर्वोच्च न्यायालय पूर्ण क्षमतेनिशी काम करू शकणार आहे.

Advertisement

कोटिश्वर सिंह हे फेब्रुवारी 2023 पासून जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. न्यायाधीश सिंह हे मूळचे मणिपूरचे आहेत. सिंह हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणारे मणिपूरमधील पहिले व्यक्ती ठरणार आहेत. कोटिश्वर सिंह यांचे वडिल एन. इबोटोम्बी सिंह हे गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. तसेच ते मणिपूरचे पहिले अॅडव्होकेट जनरल राहिले होते.

कोटिश्वर सिंह यांनी काही काळापर्यंत सर्वोच्च न्यायालयात वकिली देखील केली होती. कोटिश्वर सिंह यांनी 2011 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. तर 2012 मध्ये त्यांना स्थायी न्यायाधीश करण्यात आले होते. 2013 साली मणिपूर उच्च न्यायालयाच्या स्थापनेनंतर कोटिश्वर सिंह यांना तेथील न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. नंतर मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करण्यापूर्वी 2018 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयात त्यांची बदली करण्यात आली होती.

न्यायाधीश आर. महादेवन हे 2024 पासून मद्रास उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. प्रत्यक्ष कर, सीमाशुल्क आणि केंद्रीय अबकारी कर यासारख्या विषयांमध्ये त्यांना प्राविण्य प्राप्त आहे. तामिळनाडू सरकारसाठी अतिरिक्त वकील आणि मद्रास उच्च न्यायालयात केंद्रासाठी स्थायी वकील म्हणून त्यांनी काम केले आहे. यादरम्यान त्यांनी 9 हजारांहून अधिक खटले त्यांनी हाताळले आहेत. 2013 मध्ये मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.