For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसचे खलप, विरियातो यांचे अर्ज सादर

03:01 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसचे खलप  विरियातो यांचे अर्ज सादर
Advertisement

दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन : काँग्रेस प्रदेशाध्यक्षासह गोवा फॉरवर्ड, आपची उपस्थिती

Advertisement

पणजी : काँग्रेसचे उत्तर गोव्यातील उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी काल बुधवारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहा गिते यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, आपचे राज्य संयोजक अॅड. अमित पालेकर, शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते दीपक कळंगुटकर उपस्थित होते. माझे मित्र आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि राज्याच्या विविध भागांत  मिळालेल्या भरघोस पाठिंब्यामुळे मी माझ्या प्रचाराला पुढे नेत आहे. राज्यातील सर्व पंथ, जात, धर्मातील लोकांच्या पाठिंब्याच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे. जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू इच्छितो. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, असा विश्वास खलप यांनी व्यक्त केला.

गुन्हे अंगावर घ्यायला तयार : पाटकर

Advertisement

खलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी सांगितले की, उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपने आपल्या सत्तेच्या बळावर आणि सरकारी यंत्रणेमार्फत काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविल्याबद्दल त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. आज राज्यातील प्रमुख दैनिकांमध्ये जाहिरात देऊन या खोट्या तक्रारीबाबत जनतेला माहिती देण्यात आली आहे. जर लोकांच्या प्रश्नावर आवाज उठविल्याबद्दल भाजप पक्ष आम्हाला गुन्हेगार ठरवत असेल तर आम्ही जनतेच्या कामासाठी असे खोटे गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, असे पाटकर म्हणाले.

भाजपाने केले सुडाचे राजकरण : पालेकर

आपचे राज्य संयोजक अॅड. अमित पालेकर म्हणाले, भाजपने गेल्या दहा वर्षांत केवळ आणि केवळ सुडाचे राजकारण केले. लोकशाही मार्गाने कुणी आवाज उठवला तर त्यांना तुऊंगात डांबण्याशिवाय भाजप सरकारने काहीच केले नाही. देशातील युवक, गोर-गरीब जनता, वृद्ध नागरिकही भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. गोवा राज्यातील दोन्ही जागांवर इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार निर्विवादपणे निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या प्रश्नाकडे भाजपचे दुर्लक्ष

गोव्यात म्हादई नदी, बंद असलेला खाण उद्योग, रोजगार निर्मिती निर्माण करण्याकडे भाजपने कोणतेच लक्ष दिले नाही. याबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवला तर त्यांना सरकारी यंत्रणेद्वारे दाबण्याचा प्रयत्न झाला. गोव्यात रेल्वे दुपरीकरण, कोळसा वाहतूक, तमनार प्रकल्प आदी मुद्यांवर लढाई सुरू आहे. तरीही भाजपने जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ विरोधी पक्षातील आमदारांना, नेत्यांना फोडण्यातच आपला वेळ वाया घालवला. भाजपच्या कारभाराला जनता विटली असून, लोकांना आता बदल हवा आहे आणि मतदारसंघात प्रचारातून लोकांच्या तशा प्रतिक्रियाही येत असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांकडून विजयाचा हार; बदल नक्की!

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचा आवाज गेली 25 वर्षे लोकसभेत पोचला नाही. त्यामुळे उत्तर गोव्यातील जनता आमचा आवाज बनून तुम्हीच लोकसभेत जा. प्रचारासाठी ज्या ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. ‘भाई तुम्ही पुढे जा’ या लोकांच्या भूमिकेमुळे सुमारे 40 ते 50 हजार मतदाधिक्क्याने माझा विजय निश्चित आहे. 25 वर्षानंतर उत्तर गोवा मतदारसंघात बदल होणार असून, कार्यकर्त्यांनी आत्ताच विजयाचा हार आपणास घातल्याने आपला विजय निश्चित आहे, असे अॅङ रमाकांत खलप यांनी अर्ज सादर केल्यानंतर सांगितले.

माझी उमेदवारी सर्वसामान्यांची! : कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचे प्रतिपादन

दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काल बुधवारी रामनवमीचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी मडगावातील श्रीराम मंदिराला भेट दिली तसेच फातोर्डा लिंगावर जाऊन श्री दामबाबाचे तसेच शेजारील सेंट फ्रान्सिस झेवियर कपेलमध्ये जाऊन देवांचे आशीर्वाद घेतले. आपली उमेदवारी ही दक्षिण गोव्यातील सर्वसामान्य जनतेची उमेदवारी आहे, असे विरियातो फर्नांडिस यावेळी म्हणाले. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आपला उमेदवारी अर्ज दक्षिण गोव्याचे निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू यांच्याकडे दाखल केला. यावेळी इंडिया आघाडीचे घटक पक्ष गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हियेगस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते.

आपली उमेदवारी सर्वसामान्यांची

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले की, आपली उमेदवारी ही दक्षिण गोव्यातील सर्वसामान्य जनतेची उमेदवारी आहे. पारंपरिक मच्छीमार, मोटरसायकल पायलट, टॅक्सीचालक, घाम गाळणारे शेतकरी,  छोटे व्यापारी तसेच लघु उद्योजक यांचा आपण संसदेत आवाज होणार आहे. बेरोजगारी, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, कोळसा वाहतूक, तमनार प्रकल्प, बंद असलेला खाण उद्योग, म्हादई नदी, वनांचे रक्षण हे गोव्यातील ज्वलंत प्रश्न आहेत. या प्रश्नांवरून आंदोलने छेडण्यात आली. या प्रश्नावर लढाई सुरू आहे. हे सर्व तसेच इतर महत्वाचे प्रश्न आपण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संसदेत मांडणार व गोव्याला न्याय मिळवून देण्यासाठी झटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पाच पांडव भाजपला भारी पडणार

इंडिया आघाडीकडे आमदार विजय सरदेसाई, युरी आलेमाव, वेन्झी व्हियेगस, व्रुझ सिल्वा व एल्टन डिकॉस्ता हे पाच पांडव आहेत. ते हुकूमशहा भाजपला भारी पडणार असल्याचा दावा कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी गोव्यात येऊन लोकांना अनेक आश्वासने दिली होती. यातील किती आश्वासने त्यांनी पूर्ण केली हे अगोदर जनतेला सांगावे. खनिज व्यवसाय सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली होती. ती पूर्ण केली काय? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. आता ते पुन्हा एकदा गोवा भेटीवर येणार आहेत. ते फक्त खोटी आश्वासने देण्यासाठीच. त्यांच्या आश्वासनाला येथील लोक बळी पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

रोड शो द्वारे शक्ती प्रदर्शन

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन घडविले होते. त्याला तोडीस तोड प्रतिउत्तर देताना काल इंडिया आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन घडविले. या रोड शो च्या पूर्वी सर्वजण काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ एकत्र आले. त्या ठिकाणी कांता गावडे आणि साथीची घोडेमोडणी तसेच अन्य एका पथकाचे ड्रम वाद्य होते. त्यांनी रोड शो ला साथ दिली. रोड शो मध्ये उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार व्हेन्झी व्हियेगस, आमदार व्रुझ सिल्वा, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्ड प्रशांत नाईक, मोहनदास लोलयेकर तसेच मडगाव पालिकेचे नगरसेवक, कुंकळळी पालिकेचे नगरसेवक, सरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य तसेच इंडिया आघाडीच्या इतर पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.