‘माझे घर’ योजनेचे अर्ज सोमवारपासून उपलब्ध
मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
पणजी : राज्य सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि नुकत्याच गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या ‘माझे घर’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी विविध अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. येत्या सोमवारपर्यंत योजनेचे अर्ज लोकांसाठी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्वरी सचिवालयात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, महसूल सचिव संदीप जॅकीस, यांच्यासह दोन्ही जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पंचायत संचालक, पालिका संचालक, मामलेदार आणि महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
या योजनेची राज्यभरात प्रभावी आणि सुरळीत अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. घरांचे हक्क मिळविण्यासंदर्भात लोकांची दीर्घकाळाची मागणी होती. तिची आता पूर्तता करण्यात येणार असून अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि कालबद्ध पद्धतीने त्यांना ते मिळतील याची हमी देण्यासाठी सर्व अधिकारी एकत्रितपणे काम करतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या 11 पद्धतीनी अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. पैकी पाच मुख्य योजना असून त्या प्राधान्याने राबविल्या जातील. सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळेल याची खात्री करण्यात येईल. त्यादृष्टीने प्रत्येक अधिकाऱ्याने कार्यक्षम व्हावे, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.