For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शक्तिप्रदर्शनासह श्रीपाद, पल्लवी यांचे अर्ज दाखल

01:09 PM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
शक्तिप्रदर्शनासह श्रीपाद  पल्लवी यांचे अर्ज दाखल
Advertisement

जोरदार शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी : दोघांनीही वर्तविली विजयाची खात्री

Advertisement

पणजी : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघातून अनुक्रमे श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे यांनी मंगळवारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि जोरदार घोषणाबाजीसह अर्ज सादर केले. दोन्ही उमेदवारांच्या सोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची उपस्थिती होती. पणजीत मंत्री विश्वजित राणे, आमदार जेनिफर मोन्सेरात, तर मडगावात सभापती रमेश तवडकर, मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री रवी नाईक,  आदींची उपस्थिती होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दोन्ही उमेदवारांनी स्वत:च्या विजयाची खात्री व्यक्त केली. श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांच्याकडे अर्ज सादर केला तर पल्लवी धेंपे यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. यावेळी मंत्री बाबूश मोन्सेरात, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार मायकल लोबो, आलेक्स सिक्वेरा यांच्यासह दोन्ही जिह्यामधील अन्य मंत्री, आमदार, उमेदवारांचे कार्यकर्ते, हितचिंतक, यांच्यासह दोन्ही जिह्यांमधील लोकप्रतिनिधी, पक्षांचे नेते, प्रभारी, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

भारताला कणखर नेतृत्वाची गरज : मुख्यमंत्री

Advertisement

उमेदवारी दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी निर्णायक आणि कणखर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. हे नेतृत्व केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात, याबद्दल आता गोमंतकीयांनाही खात्री पटली आहे. म्हणूनच यंदा निवडणुकीसाठी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता एवढा उत्साह लोकांमध्ये दिसत आहे. तसेच ज्याप्रकारे आमचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत ते पाहता भाजप पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत आमच्याकडे यंदा दुप्पट ताकद आहे. या कार्यात मोदीजींचे हात अधिक बळकट करण्यासाठी गोमंतकीय दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांना विजयी करून योगदान देतील व ‘फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार’ हे घोषवाक्य सत्य ठरवतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. श्रीमती धेंपे यांनी यावेळी बोलताना, विरोधकांनी कितीही आरोप, टीका केली तरी काहीच फरक पडणार नसल्याचे सांगितले. काँग्रेसला त्यांचे मुद्दे हाताळू द्या. त्यांच्या टीका-आरोपांवर भाष्य करण्यापेक्षा आपण सकारात्मक पद्धतीने प्रचार करण्यावर भर देणार आहे. लोककल्याणार्थ काम करणे हे आपले ध्येय असून पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी झटणार आहे, असे त्या म्हणाल्या.

जोरदार घोषणाबाजीसह वातावरण निर्मिती

प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यापूर्वी दोन्ही उमेदवार अनुक्रमे भाजपच्या पणजी आणि मडगाव येथील जिल्हा कार्यालयांजवळ आले. तेथून शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबतीने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंतचा पायी प्रवास केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसरात वातावरण निर्मिती केली.

पल्लवी धेंपे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेंपे यांनी काल मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दक्षिण गोव्याचे निवडणूक अधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मगो पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा कृषीमंत्री रवी नाईक व सभापती रमेश तवडकर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पल्लवी धेंपे यांनी मडगावच्या दामोदर सालात जाऊन देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर मडगाव कदंब बसस्थानकाजवळील भाजप कार्यालयात जाऊन मंत्री व आमदार तसेच कार्यकर्त्यांकडे संवाद साधला. दक्षिण गोव्याच्या वीसही मतदारसंघांतून भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. या ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दक्षिण गोव्यातून भाजप 60 हजार मतांच्या आघाडीने जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी पुढील दिवसांत दिवस-रात्र काम करून पल्लवी धेंपे यांचा विजय नक्की करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनीही पल्लवी धेंपे यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान द्यावे लागणार असल्याचे सांगितले. ही निवडणूक देशाच्या हिताने खूपच महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

त्यानंतर रोड शो करून सर्वजण दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. या रोड शो मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मडगावचे आमदार दिगंबर कामत, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर, आमदार उल्हास तुयेकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार निलेश काब्राल, प्रदेश सरचिटणीस अॅड नरेंद्र सावईकर, दामू नाईक, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, सर्वानंद भगत, भाजपच्या प्रदेश महिला अध्यक्षा, मडगावचे नगरसेवक, दक्षिण गोव्यातील विविध पंचायतीचे सरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य तसेच पक्षाचे मंडळ अध्यक्ष व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. पल्लवी धेंपे यांचे पती श्रीनिवास धेंपे तसेच मुलगी आणि आई देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पल्लवी धेंपे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, आपल्याला लोककल्याणार्थ काम करायचे आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला, त्याला तडा जाऊ देणार नाही. मला आतापर्यंत दक्षिण गोव्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून तो असाच कायम ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. दक्षिण गोव्यात प्रचाराला फिरताना आपल्यासमोर प्रामुख्याने नोकरीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. त्यावर योग्य तो तोडगा सरकारतर्फे काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. खनिज व्यवसायाचा मुद्दा तसेच रेल्वे दुपदरीकरणाचा प्रश्नही उपस्थितीत झालेला नाही असे त्यांनी सांगितले. म्हादईचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर आपल्याला भाष्य करायचे नाही असे त्या म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.