प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
बेळगाव : प्रत्येक कुटुंबाला एलपीजी गॅस उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रधान मंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा तिसरा टप्पा मागील दोन दिवसांपासून सुरू झाला असून नोंदणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांना संपूर्ण कनेक्शन मोफत देण्यासोबतच सिलिंडर घेतल्यानंतर सबसिडीही देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात आजही महिला चुलीवरच स्वयंपाक करतात. चुलीद्वारे निघणाऱ्या धुरामुळे वायूप्रदूषणही होते. त्याचबरोबर महिलांनाही आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याची दखल घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. पहिल्या टप्प्यात मागासवर्गीय, तर दुसऱ्या टप्प्यात दारिद्र्यारेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांना गॅस कनेक्शन व सिलिंडर देण्यात आले.
मागील दोन दिवसांपासून उज्ज्वला योजना 3.0 सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन गॅस वितरक एजन्सीकडून केले जात आहे. पात्र कुटुंबांनी घरातील महिलेच्या नावाने योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे. यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक यांची आवश्यकता आहे. ज्यांच्या घरामध्ये यापूर्वी इतर गॅस कनेक्शन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. परराज्यातून आलेल्या नागरिकांनी रेंट अॅग्रीमेंट देऊन या योजनेचा लाभ मिळवू शकतात. राज्यातील कोणत्याही शहराचे रेशनकार्ड ग्राह्या धरले जाते. कॅम्प येथील तेजस्विनी एंटरप्रायझेस येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी महिलांची गर्दी होऊ लागली आहे. या योजनेतील महिलांचे निधन झाले असेल तर त्यांच्या कुटुंबीयांनी केवायसी करून या योजनेचा लाभ घ्यावा, अशी माहिती संचालक आशिष कालकुंद्रीकर व व्यवस्थापक नारायण बिष्णोई यांनी दिली.
योजनेचा लाभ काय?
प्रधानमंत्री योजनेतून नागरिकांना संपूर्णपणे मोफत कनेक्शन दिले जाणार आहे. शेगडी, सिलिंडर तसेच रेग्युलेटर यांचा समावेश असणार आहे. तसेच प्रत्येक सिलिंडर मागे सध्या 300 रुपयांची सबसिडी दिली जात आहे. ही सबसिडी ग्राहकांच्या खात्यावर जमा केली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हा सिलेंडर नागरिकांना 500 रुपयांना मिळणार असल्याने नोंदणीसाठी गर्दी होऊ लागली आहे.