महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव, चिकोडीत आजपासून अर्ज

09:55 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यातील 14 मतदारसंघांत अधिसूचना जारी : उमेदवारी दाखल करण्यासाठी 19 एप्रिलपर्यंत मुदत

Advertisement

बेंगळूर : लोकसभा निवडणूक प्रचाराला जोर आलेला असतानाच देशातील तिसऱ्या आणि राज्यातील दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवार 12 एप्रिल रोजी जारी होणार आहे. बेळगाव, चिकोडीसह उत्तर कर्नाटकातील 14 जिल्ह्यांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. अर्ज दाखल करण्यासाठी 19 एप्रिल शेवटचा दिवस आहे. कर्नाटकात दोन टप्प्यात लोकसभेची निवडणूक होत आहे दक्षिण कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. येथील उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर उत्तर कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक आयोग आज अधिसूचना जारी करत आहे. त्यामुळे शुक्रवारपासूनच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून निवडणूक प्रचाराला आणखी जोर येईल. राज्यातील मध्य कर्नाटक, कल्याण कर्नाटक (हैदराबाद-कर्नाटक), कित्तूर कर्नाटक व मलनाड भागातील शिमोगा या भागात 14 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या भागात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 19 एप्रिलपर्यंत मुदत आहे. 20 रोजी अर्ज छाननी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 22 एप्रिल शेवटचा दिवस आहे.

Advertisement

मातब्बरांचा लागणार कस

दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या मतदारसंघांमध्ये अनेक मातब्बर नेत्यांचा कस लागणार आहे. शिमोगा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र व विद्यमान खासदार बी. वाय. राघवेंद्र, काँग्रेसमधून अभिनेते शिवराजकुमार यांच्या पत्नी गीता शिवराजकुमार रिंगणात उतरतील. त्याचप्रमाणे दावणगेरेमधून मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्या पत्नी डॉ. प्रभा मल्लिकार्जुन व विद्यमान खासदार जी. एम. सिद्धेश्वर यांच्या पत्नी गायत्री सिद्धेश्वर एकमेकांसमोर उभ्या ठाकतील. हावेरीतून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, धारवाडमधून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, बेळगावमधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपतर्फे अर्ज दाखल करतील. कलबुर्गीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोडमनी, चिकोडीतून मंत्री सतीश जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका जारकीहोळी, बेळगावमधून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, बिदरमधून मंत्री ईश्वर खंड्रे यांचे पुत्र सागर खंड्रे निवडणूक लढवतील. कारवारमधून  भाजपतर्फे विधानसभेचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि काँग्रेसच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्यात लढत होईल.

सुरपूर विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक

2023 च्या विधानसभा निवडणुकीत यादगिरी जिल्ह्याच्या सूरपूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस आमदार राजा वेंकटप्पा नायक यांच्या निधनामुळे सुरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या मतदारसंघातही 7 मे रोजी मतदान होणार असून शुक्रवारी अधिसूचना जारी होणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासूनच येथे देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. पोटनिवडणुकीची मतमोजणीही 4 जून रोजी होणार आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी येथे यापूर्वीच उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने राजा वेंकटप्पा नायक यांचे पुत्र वेणू वेंकटप्पा नायक यांना तिकीट दिले आहे. तर भाजपने माजी मंत्री राजूगौडा नरसिंहनायक यांना उमेदवारी दिली आहे.

देशातील तिसऱ्या टप्प्यातील (राज्यात दुसऱ्या) निवडणुकीचे वेळापत्रक

या मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान

राज्यातील दुसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी बेळगाव, चिकोडी, बागलकोट, कलबुर्गी, विजापूर, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, कारवार, दावणगेरे, शिमोगा या 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. येथे एकूण 2,88,08,182 जण मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article