युवानिधी योजनेसाठी 21 डिसेंबरपासून अर्ज
बेंगळूर : राज्य सरकारने घोषणा केलेल्या गॅरंटी योजनांपैकी ‘युवानिधी’ योजना जानेवारी 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर 21 डिसेंबरपासून नोंदणीला सुरुवात होणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने यापूर्वी शक्ती, अन्नभाग्य, गृहलक्ष्मी आणि गृहज्योती योजना जारी केल्या आहेत. आता पाचवी गॅरंटी योजना ‘युवानिधी’ पुढील वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच जानेवारीमध्ये जारी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी 21 डिसेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करून जानेवारीमध्ये अधिकृतपणे चालना दिली जाणार आहे. याद्वारे 5 लाख पदवीधर बेरोजगार युवकांना मदतनिधी दिला जाणार आहे, अशी माहितीही डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी दिली आहे. नुकताच डिप्लोमा पूर्ण केलेल्या बेरोजगारांना दरमहा 1,500 रुपये आणि बेरोजगार पदवीधरांना 3 हजार रुपये युवानिधी अंतर्गत दिले जाणार आहेत. नोकरी लागेपर्यंत किंवा कमाल 2 वर्षापर्यंतच हा निधी दिला जाणार आहे. सदर योजना राबविण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.