बोरी पुलावरील वाहतूक कोंडीमुळे ‘त्या’ अर्जदारांची परीक्षा हुकली
मडगाव केंद्रावर चाळीस उमेदवार पोचले उशिरा परीक्षेला बसण्याची संधी पुन्हा द्यावी
फोंडा : बोरी पुलाच्या दुऊस्तीकामामुळे रविवारी सकाळी झालेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि पुलाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात लागलेल्या वाहनांच्या रांगा याचा फटका कर्मचारी भरती आयोग अंतर्गत मडगाव येथे लेखी परीक्षेला गेलेल्या फोंडा तालुक्यातील बऱ्याच उमेदवारांना बसला. परीक्षा केंद्रावर उशिरा पोचल्याने विनवण्या कऊनही त्यांना आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे परीक्षा न देताच त्यांना माघारी फिरावे लागले. सरकारने फेरपरीक्षा घेऊन हुकलेली संधी पुन्हा देण्याची मागणी या उमेदवारांनी केली आहे. बोरी येथील जुवारी पुलाची दुऊस्ती आणि भार क्षमता वाढविण्याचे काम विविध चार टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दि. 11 ऑक्टोबरपासून पुढील चार शनिवार रात्री 8 ते सकाळी 8 वा. यावेळेत वाहतुकीसाठी पूल बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशीचे काम आटोपून रविवारी निर्धारीत वेळेत पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकला नाही. त्यामुळे फोंडा व मडगाव अशा दोन्ही बाजुंनी प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागून राहिल्या. काल रविवार दि. 12 रोजी सकाळी कर्मचारी भरती आयोगांतर्गत सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते तसेच इतर काही खात्यांमध्ये नोकर भरतीसाठी लेखी परीक्षा होत्या. राज्यातील काही परीक्षा केंद्रे नावेली मडगाव येथील रोझरी कॉलेज व फातोर्डा येथील डॉनबॉस्को कॉलेजमध्ये होती. फोंडा तालुक्यातील फोंडा, मडकई, प्रियोळ या मतदारसंघांसह अन्य भागातील उमेदवार बोरी पुलावरील वाहतूक कोंडीत अडकून पडले. त्यापैकी काही उमेदवार कनिष्ठ अभियंता पदासाठी लेखी परीक्षा देणार होते. फोंड्यातील एका उमेदवाराने दिलेल्या माहितीनुसार तो स्वत: व अन्य दोघे उमेदवार कारगाडीने रविवारी सकाळी लवकर मडगावला निघाले होते.
परीक्षा केंद्रावरील रिपोर्टिंगची वेळ सकाळी 10.45 ते 11.15 अशी होती. पण प्रत्यक्षात सकाळी 9.30 वा. फोंड्याहून निघालेले हे उमेवार बोरी पुलापासून साधारण एक किलोमिटरच्या अंतरावर लागून राहिलेल्या वाहनांच्या रांगेत अडकून पडले. तेथून पर्यायी मार्गाने जाण्यासाठी त्यांनी आडपई रासई फेरीकडे वाहन वळविले. पण तेथेही वाहनांची तोबा गर्दी असल्याने एकावेळी चारच कारगाड्या फेरीबोटीतून जाऊ शकत होत्या. धावपळ करीत त्यांनी कसेबसे 11.40 वा. पर्यंत परीक्षा केंद्र गाठले. पण परीक्षेच्या नियोजित वेळेनुसार त्यांना दहा मिनिटे उशिर झाला होता. फोंडा तालुका व अन्य भागातून बोरी पूलमार्गे आलेले साधारण तीसहून अधिक उमेदवार उशिरा पोचले होते. त्यांनी उशिर होण्यामागील कारण केंद्र प्रमुखांना सांगत परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याची विनवणी केली. पण केंद्र प्रमुखाने त्यांचे ऐकून घेतले नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून या उमेदवारांनी परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा केंद्र प्रमुखांची भेट घेऊन आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचाही काही फायदा होऊ शकला नाही. प्राप्त माहितीनुसार बोरी पुलावरील वाहतूक कोंडीमुळे चाळीसच्या आसपास उमेदवारांना उशिरा पोचल्याने परीक्षेला बसता आलेले नाही.
निर्धारीत वेळेपेक्षा उशिरा पूल झाला खुला
बोरी पुलाच्या दुऊस्तीकामासाठी शनिवार दि. 11 रोजी रात्री 8 ते रविवारी सकाळी 8 वा. अशी वाहतूक बंदीची वेळ निर्धारीत केली होती. पण प्रत्यक्षात वाहतुकीसाठी पूल सकाळी 11 वा. खुला करण्यात आला. त्यामुळे सकाळी 8 वा. पासूनच पुलाच्या दोन्ही बाजूने वाहने बराचवेळ अडकून पडली होती. पर्यायी मार्ग असलेल्या शिरोडा राय राशोल फेरी मार्गावरही वाहनांची प्रचंड गर्दी होती. तसेच आडपई रासई फेरीमार्गावरही त्याहून वेगळी परिस्थिती नसल्याने मडगावकडे ये जा करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.