अॅपलची आर्थिक वर्षात 75 हजार कोटीची विक्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयफोन बनवणारी अॅपल कंपनीने भारतात वर्षाच्या आधारावर पाहता विक्रीमध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अॅपल कंपनीची विक्री 75 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे पाहता भारतामध्ये अॅपलच्या उत्पादनांना मागणी वाढीव असल्याचे स्पष्ट होते. ब्लुमबर्ग यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या अहवालातील माहितीनुसार मार्च 2025 पर्यंत 12 महिन्यात कंपनीची विक्री जवळपास 13 टक्के वाढलेली आहे. 2023-24 च्या आर्थिक वर्षांमध्ये कंपनीची विक्री 8 अब्ज डॉलरची होती. यामध्ये आयफोनच्या विक्रीचा वाटा सर्वाधिक राहिलेला आहे. यासोबतच कंपनीच्या मॅकबुक या उत्पादनाला देखील ग्राहकांनी चांगला प्रतिसाद नोंदवल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आणखी स्टोअर्स सुरु करणार
जागतिक स्तरावर मोबाईलची विक्री कमी झालेली असताना भारतामध्ये मात्र कंपनीने चांगले प्रदर्शन केले आहे. भारतात कंपनीने गेल्या आठवड्यात बेंगळूर आणि पुणे या ठिकाणी दोन रिटेल स्टोअर सुरू केली आहेत. लवकरच नोएडा आणि मुंबईमध्येही नवी स्टोअर्स खुली केली जातील असे म्हटले आहे. भारतामध्ये अॅपलच्या हिस्सेदारीचा विचार करता स्मार्टफोन बाजारात 7 टक्के इतका वाटा असल्याची माहिती आहे. भारतामध्ये आयफोनची किंमत पाहता आयफोन-16ची किंमत 79 हजार 900 रुपये इतकी आहे तर अमेरिकेमध्ये याच फोनसाठी 70 हजार रुपये ग्राहकांना द्यावे लागतात. विक्री वाढवण्यासाठी कंपनीने स्टुडन्ट डिस्काउंट, ट्रेड इन ऑफर आणि बँकेच्या ऑफर्स माध्यमातून प्रयत्न चालवले आहेत.