अॅपलचा आयफोन उत्पादनात विक्रम
40 हजार कोटींचे उत्पादन: 85 टक्के निर्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
दिग्गज आयफोन निर्माती अॅपल कंपनीने नवी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीने 40145 कोटी रुपयांच्या आयफोन्सचे उत्पादन केलेले असून त्यापैकी 85 टक्के आयफोन्सची निर्यात करण्यात आली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2025 च्या 4 महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जुलै या कालावधीत 40,145 कोटी रुपयांचे आयफोन तयार केले असून त्यापैकी 85 टक्के स्मार्टफोन्स निर्यात करण्यात आले आहेत.
पीएलआय योजनेत उत्तम योगदान
या योगे कंपनीने सरकारच्या पीएलआय योजनेचा पुरेपूर लाभ उठवत उद्दिष्ट साध्य केले आहे. कंपनीने चार महिन्यांमध्ये 34 हजार 89 कोटी रुपयांच्या मूल्याचे फोन निर्यात केले आहेत. 2025 च्या एप्रिल-जून या अवधीमध्ये कंपनीने 3 अब्ज डॉलर्सच्या आयफोनची निर्यात केली होती. 2025 साठी कंपनीने 9 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष ठेवले असून पहिल्या चार महिन्यांमध्ये यापैकी 45 टक्के वाटा प्राप्त करण्यात कंपनीने यश मिळवले आहे.
निर्मितीत 66 टक्के उद्दिष्ट साध्य
आयफोनची निर्मितीतील तीनही कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये 60 हजार कोटी रुपयांपर्यंतचे लक्ष गाठण्याचे निश्चित केले आहे. यापैकी 66 टक्के उद्दिष्ट चार महिन्यांमध्येच पूर्ण झाले आहे.