फोल्डेबल उत्पादने आणणार अॅपल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयफोन निर्माती दिग्गज कंपनी अॅपल यांनी पुढील वर्षी आपली फोल्डेबल उत्पादने सादर करण्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. ही नवी उत्पादने फॉक्सकॉनच्या कारखान्यामध्ये तयार केली जाणार आहेत. फॉक्सकॉन ही अॅपलची उत्पादने कंत्राटी पद्धतीने आपल्या कारखान्यामध्ये तयार करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी अॅपल कंपनीची स्मार्टफोनसह फोल्डेबल उत्पादने ग्राहकांसाठी सादर केली जातील. फोल्डेबल आयफोनसह कंपनी मोठ्या स्क्रीनचा फोल्डेबल आयपॅडही सादर करणार असल्याचे समजते.
दुसऱ्या सहामाहीत उत्पादनाला गती
2026 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये फोल्डेबल उत्पादनांच्या निर्मितीला गती दिली जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. नवा फोल्डेबल आयफोन 8 इंचाचा असू शकतो, असेही म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे त्याची जाडी सर्वात कमी 9 ते 9.5 एमएम इतकी असेल, असेही बोलले जात आहे. स्टेनलेस स्टीलचा वापर फोनकरता केला जाईल, असेही समजते.