अॅपलने केली भारतात मजबूत कामगिरी
मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अॅपल कंपनीने भारतात मजबूत दुहेरी अंकी कामगिरीची नोंद केली आहे. तसेच मार्चअखेरच्या तिमाहीत नवीन महसूल विक्रम प्रस्थापित केला आहे, असे अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी शुक्रवारी सांगितले. भारतीय बाजारपेठेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जात आहे. ते म्हणाले की अॅपल विकासकांपासून बाजारपेठेपर्यंतच्या संपूर्ण परिसंस्थेवर काम करत आहे आणि वाढीच्या आकडेवारीने अत्यंत खूश आहे.
टेक कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील कमाईमध्ये भारताच्या योगदानाबद्दल ते म्हणाले, आम्ही मजबूत दुहेरी अंकी वाढ नोंदवली (भारतात) याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. मार्च तिमाहीत महसूल संग्रहात विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. भारताकडे आश्चर्यकारकपणे उत्साहवर्धक बाजारपेठ म्हणून पाहतो आणि त्यावरच आम्ही प्रामुख्याने लक्ष केंद्रित करत आहोत असेही सीईओंनी स्पष्ट केले आहे.
क्युपर्टिनो-आधारित आयफोन निर्मात्याने डझनहून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये मार्चअखेरच्या तिमाहीत विक्रमी कमाई नोंदवली आहे. यामध्ये भारत, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्व, तसेच कॅनडा, स्पेन आणि तुर्कस्तान यांचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत अमेरिकन 90.8 अब्ज डॉलर्सची कमाईची नोंद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढीची क्षमता
अॅपलच्या भारतातील कामगिरीबद्दल कुक म्हणाले की, कंपनीचे कार्यालयीन कामकाज व्यवस्थितपणे सुरु असून विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. ते म्हणाले, आम्ही गेल्या वर्षी काही स्टोअर्स उघडली आहेत आणि आम्हाला तेथे प्रचंड वाढीची क्षमता दिसत आहे. पुढील काळात याबाबत आढावा घेऊन अधिक चांगले नियोजन करण्याप्रती कंपनी सज्ज आहे.