अॅपल आयफोनच्या जागतिक शिपमेंटमध्ये घसरण
इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनच्या अहवालात माहिती : भारतात आयफोनची शिपमेंट वाढली
वृत्तसंस्था/ बेंगळूर
अॅपल आयफोनच्या जागतिक शिपमेंटमध्ये 9 टक्के घसरण झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या तुलनेमध्ये अॅपल आयफोनची भारताला होणारी शिपमेंट 40 टक्के वाढली आहे. चीन आणि इतर संभाव्य बाजारांमध्ये शिपमेंटमध्ये 10 टक्के घसरण दिसून आली आहे.
स्मार्टफोन करिता जगातील सर्वात मोठी दुसरी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. मार्च तिमाहीमध्ये 25 लाख आयफोनची शिपमेंट भारतात करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत जागतिक स्तरावरची आयफोनची शिपमेंट 9.6 टक्के घसरणीत राहिली असल्याचे इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन (आयडीसी) च्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. या खेपेला मात्र शिपमेंटमध्ये वाढीत योगदान देताना कोरियाच्या सॅमसंग कंपनीने बाजी मारली आहे.
जागतिक बाजारात वाटा घसरला
आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत अॅपलचा जागतिक बाजारातील वाटा 16 टक्क्यांवर राहिला आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत अॅपलचा वाटा 21 टक्के राहिला होता. चीन आणि युरोपमध्ये कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या तुलनेमध्ये भारतामध्ये शिपमेंट वाढत असल्याने या देशावरच कंपनीने आपले लक्ष अधिक केंद्रित केले आहे.
भारतातून आयफोन निर्यातीत दुप्पट वाढ
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातून होणाऱ्या अॅपल आयफोनची निर्यात दुप्पट झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने 12.1 अब्ज डॉलर्सच्या आयफोनची निर्यात केली आहे. या मागच्या आर्थिक वर्षामध्ये 6.27 अब्ज डॉलर्सच्या आयफोनची निर्यात केली गेली होती. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातून होणाऱ्या एकंदर स्मार्टफोनची निर्यात 16.5 अब्ज डॉलरची झाली आहे. मागच्या वर्षी 12 अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोनची निर्यात केली गेली होती.