काँग्रेसकडून मुस्लीमांचे तुष्टीकरण !
‘काँग्रेस मुस्लीम पक्षपात करणारा राजकीय पक्ष आहे. एकगठ्ठा मतांसाठी या समाजाचे लांगूलचालन करण्यात हा अपक्ष धन्यता मानतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने सर्व नागरीक समान असून ते कोणत्याही धर्माच्या बाजूने पक्षपात करत नाहीत,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीराज सिंग यांनी केले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी अनेक योजना चालविल्या. त्यांचा लाभ त्यांनी सर्व धर्मांच्या नागरीकांना मिळवून दिला. कल्याणकारी योजनांमध्ये कधीही धर्म किंवा जातीच्या आधारावर पक्षपात केला नाही. काँग्रेसने मात्र, मुस्लीमांना आपल्या व्होट बँकेसाठी नेहमीच महत्व दिले. कर्नाटकात अत्यंत गुप्तपणे सर्व मुस्लीमांचा समावेश अन्य मागासवर्गीयांमध्ये करण्यात आला. त्यामुळे हिंदू मागासवर्गीयांवर मोठा अन्याय झाला. त्यांना मिळणारे आरक्षण कमी झाले. आता राष्ट्रीय पातळीवर हे धोरण राबविण्याची काँग्रेसची योजना आहे. तथापि, या देशातील नागरीक सुजाण असून ते अशा योजना करणाऱ्या पक्षांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मथुरा, काशीही होणार...
अयोध्येत भगवान रामलल्लांचे भव्य राममंदिर निर्माण होत आहे. तशाच प्रकारे मथुरेत भगवान कृष्णाचे आणि काशीत भगवान शंकराचे भव्य मंदीर निर्माण होईल. मात्र, त्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला पुन्हा प्रचंड बहुमत मिळण्याची आवश्यकता आहे. ते मिळाल्यास कोणावरही अवलंबून न राहता, हे निर्माणकार्य आम्ही करु शकू. म्हणून आम्ही ‘400 पार’ची घोषणा दिली आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी या घोषणेचा अर्थ सांगताना केले.