‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट आणि ‘मयत रिटर्न’चे नाटक!
जमीन हडपण्यासाठी एजंटांची शक्कल, मयत व्यक्तीच्या नावे बोगस मालकाची हजेरी, उपनोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांचीही मदत
प्रतिनिधी / बेळगाव
एखाद्याच्या मृत्यूनंतर तो पुन्हा जिवंत होतो का? या प्रश्नावर वैद्यकीय क्षेत्रातून ‘नाही’ असेच उत्तर येते. एकदा श्वास थांबला तर तो माणूस पुन्हा जिवंत होत नाही. बेळगाव परिसरात मात्र सध्या वैद्यकीय विज्ञानालाही आव्हान देणाऱ्या अनेक चमत्कारिक घटना घडू लागल्या आहेत. कोणी 5 वर्षांनंतर जिवंत होतो तर आणखी कोणी 25 वर्षांनंतर जिवंत होऊन लोकांसमोर येतो.
गेल्या काही वर्षांत बेळगाव परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी मृत्यू झालेली महिला किंवा पुरुष पुन्हा जिवंत होतात. हयातीत जे कार्य अर्धवट राहिले होते, ते पूर्ण करतात. आपल्या कुटुंबीयांनाही न भेटता ते निघून जातात. गेल्या आठवड्यात सीईएनचे पोलीस उपअधीक्षक जे. रघु यांच्या पथकाने महिलेसह तिघा जणांना अटक केली. त्यावेळी मृत्यूनंतर माणूस कसा जिवंत होतो? याची माहिती मिळाली.
काही वर्षांपूर्वी ‘मुळशी पॅटर्न’ नामक एक मराठी सिनेमा गाजला. शहरीकरणामुळे शहराला लागूनच असलेल्या खेड्यातील जमिनींना कशी किंमत येते? जमीन बळकावण्यासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक कशी केली जाते? याविषयीची कथा असल्यामुळे तो सिनेमा लोकप्रिय ठरला होता. बेळगाव परिसरातही खासकरून ग्रामीण भागातील जमिनींना चांगली किंमत आली आहे. कधी मारामारी करून तर आणखी कधी मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करून जमीन बळकावण्याचे प्रकार सुरू आहेत.
मुंबई येथील विनिता विजय आसगावकर या महिलेची सासू कमलाबाई यशवंत प्रभू-आसगावकर यांना एकूण बारा मुले होती. विनिताचे पती विजयचा 27 जुलै 2003 रोजी मृत्यू झाला. तर सासू कमलाबाई यांचेही 22 जुलै 2001 रोजी निधन झाले. विजय आसगावकर यांनी मृत्यूपत्र लिहून बाची येथील 8 एकर 21 गुंठे जमीन आपल्या मुलाच्या वाटणीला येते, असा उल्लेख केला होता. प्रत्यक्षात या कुटुंबीयांनी जमिनीचे उतारे काढून पाहिले असता 20 एप्रिल 2003 रोजी सागर दत्तात्रय जाधव, रा. शाहूनगर-बी. के. कंग्राळी यांच्या नावे नोंदणी झाल्याचे आढळून आले.
विनिता आसगावकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी हे प्रकरण सीईएनचे पोलीस निरीक्षक जे. रघु यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. गेल्या आठवड्यात पोलिसांनी सागर दत्तात्रय जाधव (वय 42), शांता मोहन नार्वेकर (वय 45), हारुण रशीद तहसीलदार (वय 50) दोघेही राहणार कडोली या तिघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात मुत्यानट्टी येथील सुरेश यल्लाप्पा बेळगावी (वय 35) याच्यावरही एफआयआर दाखल झाला आहे.
पोलिसांनी प्रत्यक्षात तपास हाती घेतला, त्यावेळी 22 जुलै 2001 रोजी निधन झालेल्या कमलाबाई यांच्या जागेवर शांता नार्वेकर या महिलेला उभे करून ही जमीन सागर जाधव याच्या नावे करण्यात आली आहे. 23 वर्षांनंतर कमलाबाई या जमीन व्यवहारासाठी कागदोपत्री जिवंत झाल्या आहेत. हे केवळ एक प्रकरण आहे. अशी अनेक प्रकरणे बेळगाव परिसरात घडली आहेत. जमीन व्यवहारासाठी काही वर्षांपूर्वी निधन झालेले जमीन मालक पुन्हा जिवंत झाले आहेत.
बेळगाव परिसरात वादातील व अडचणीतील जमिनी शोधून त्यांची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी एजंटांच्या टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्या जिथे खाली जमीन दिसते तिथे पोहोचतात. मूळ मालक जर परगावी असेल किंवा त्याचे निधन झाले असेल तर त्याच्या जागेवर दुसऱ्याला उभे करून जमीन हडप केली जाते. पुण्यात राहणारा आणखी एका महिलेची जमीनही अशाच पद्धतीने खोटी कागदपत्रे तयार करून हडप करण्यात आली आहे. मार्केट पोलीस स्थानकात रत्ना यशवंत मब्रूकर (वय 68) मूळच्या राहणार माळमारुती यांनी फिर्याद दिली आहे. 16 सप्टेंबर 2023 रोजी भलत्याच महिलेला उभे करून त्यांचा भूखंड लाटण्यात आला आहे.
यापूर्वीही बेळगाव परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मृत व्यक्तीला जिवंत भासवून त्याच्या जागेवर भलत्याच व्यक्तीला उभे करून जमिनीचे व्यवहार करण्यात येत आहेत. माळमारुती, मार्केट, बेळगाव ग्रामीण, टिळकवाडीसह वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कायेत्रात अशा घटना घडल्या आहेत. उपनोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांचीही अशा व्यवहारासाठी मदत घेतली जाते.
बाची येथील 8 एकर 21 गुंठे जमिनीचा व्यवहार करण्यासंबंधी उपनोंदणी कार्यालयात जे आधारकार्ड देण्यात आले आहे, ते बोगस असल्याचे प्रथमदर्शनी पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्याची खातरजमा करून घेण्यासाठी आधार प्राधिकरणाकडे ते पाठवण्यात आले आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त परराज्यात राहणाऱ्यांचे भूखंड, शेतजमिनी हडप करण्यात येत आहेत. अशा प्रकरणात अडकल्यामुळे काही जणांचा धक्क्याने मृत्यू झाल्याचीही उदाहरणे आहेत.
| भूखंडधारक, ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सीईएनच्या अधिकाऱ्यांनी कडोली येथील महिलेसह तिघा जणांना अटक केली आहे. कडोली, जाफरवाडी परिसरातही अशा आणखी काही घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांना जमिनी विकायच्या नसल्या तरी दलाल त्यांच्यामागे लागत आहेत. ‘तुमची शेतजमीन जर विकणार असाल तर ती आम्हीच घेतो’ असे सांगत दलाल घरोघरी फिरताना दिसत आहेत. ‘जर जमिनीचा वाद असला तरी तो आम्ही बघून घेतो. तुमच्यामागे फौजच उभी करतो, तुम्ही काळजी करू नका. फक्त तुमची जमीन आम्हाला द्या’ असे सांगत फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पोलीस, उपनोंदणी, महसूल खात्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच एजंट असे उद्योग करतात. त्यामुळे भूखंडधारक व ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. |