पीक विमा योजनेसाठी बागायतदारांना आवाहन
नैसर्गिक संकटकाळात आधार
बेळगाव : रब्बी हंगामातील पिकांना संरक्षण देण्यासाठी बागायत खात्यामार्फत पीक विमा योजना सुरू झाली आहे. बेळगाव, बैलहोंगल, नेसरगी, कित्तूर, हिरेबागेवाडी आदी भागातील शेतकऱ्यांना टोमॅटो तर उचगाव भागातील शेतकऱ्यांना बटाटा पिकाचा पीक विमा भरून घेतला जात आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा बागायत खात्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. बैलहोंगल, गोकाक, रायबाग, सौंदत्ती, यरगट्टी, चिकोडी, निपाणी, सदलगा, भागातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना लागू आहे. बटाटा 2225 रु., टोमॅटो 2146 रु. तर हिरवी मिरची 3500 रु. विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. संबंधितांनी 15 नोव्हेंबरपर्यंत पीकविमा हप्ता भरावा, असे कळविण्यात आले आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांना फटका बसू लागला आहे. अतिवृष्टी, ओला, सुका दुष्काळ, कीड अशा नैसर्गिक संकटाच्या काळात हा विमा योजना आधार ठरणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून पिकांना संरक्षण द्यावे असे आवाहन बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड यांनी केले आहे.