For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुपा धरणानजीकच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन

11:35 AM Aug 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
सुपा धरणानजीकच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन
Advertisement

 कर्नाटक विद्युत महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचना

Advertisement

कारवार : जोयडा तालुक्यातील काळी नदीवरील सुपा (गणेशगुढी) जलाशयाच्या खालील बाजूस नदीच्या तिरावर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना घरगुती साहित्य व जनावरांसह सुरक्षितस्थळी निघून जाण्याची सूचना सुपा कर्नाटक विद्युत महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या पत्रकात असे म्हटले आहे की, काळी नदीच्या पात्रात होडीविहार, मासेमारी किंवा अन्य बाबी करू नयेत. सुपा जलाशयाचे पाणलोट क्षेत्र लाभलेल्या जोयडा तालुक्यात खानापूर तालुक्याच्या दक्षिण भागात आणि गोव्याच्या पूर्व भागातीला पश्चिम घाट प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सुपा जलाशयातील पाणी साठविण्याची क्षमता 147.55 टीएमसी इतकी आहे. आज अखेरीस हा साठा 96.245 टीएमसी इतका झाला आहे. जलाशयाची कमाल पाण्याची पातळी 564 मीटर इतकी असून आज अखेर ही पातळी 551 मीटर इतकी झाली आहे. बुधवार अखेर जलाशय 65.23 टक्के इतके भरले आहे. जलाशय पाणलोट क्षेत्रात 18.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, 14 हजार 731 क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे.

4 हजार 831 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Advertisement

धरणातून 4 हजार 831 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जलाशयात वाहून येणाऱ्या पाण्याचा ओघ असाच सुरू राहिला तर धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जलाशयातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. त्याकरिता धरणाच्या खालील बाजूस नदीच्या काठावर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या दैनंदिन साहित्य आणि जनावरांसह सुरक्षितस्थळी निघून जाण्याची सूचना कर्नाटक ऊर्जा महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

जलाशय तुडुंब भरण्याच्या शक्यतेने महामंडळाच्या गोटात समाधान 

काळीनदीवरील या महत्त्वपूर्ण जलाशयात 1985 पासून पाणी साठवायला सुरूवात करण्यात आली आहे.गेल्या 40 वर्षात काही मोजक्याच वर्षी हे धरण तुडुंब भरले आहे. यावर्षीही हे धरण तुडुंब भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ऊर्जा महामंडळाच्या गोटात समाधान पसरले आहे. कारण सुपा जलाशयातील पाण्यावर सुपा (100 मेगावॅट), नागझरी (अंबिकानगर 870 मेगावॅट), कोडसळ्ळी (120 मेगावॅट) आणि कद्राजल ऊर्जा केंद्रातील (150 मेगावॅट) ऊर्जा निर्मितीचे भवितव्य अवलंबून असते. सुपा जलाशयात कमी पाणीसाठा म्हणजे कमी कमी ऊर्जा उत्पादन व महामंडळाला कमी महसूल असे गणित ठरलेले आहे.

Advertisement
Tags :

.