भूमिपूजन होऊन ९ वर्षांनंतरही सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भूमिपूजन कोनशिला धूळ खात उभी
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पुर्ण करा ; प्रवासी संघटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन
न्हावेली / वार्ताहर
२०१४ मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या युती सरकारचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ जून २०१५ रोजी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले होते; मात्र गेल्या नऊ वर्षात टर्मिनस कामाची साधी विटही रचली गेली नाही. केवळ भूमिपूजन करणाऱ्यांच्या नावांची कोनशिला अजूनही उभी आहे. सुदैवाने देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबत जिल्हावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ वर्षापूर्वी आपणच प्रारंभ केलेले हे काम आता पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.
याबाबत संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, २७ जून २०१५ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले. या कोनशिलेला येत्या जून महिन्यात दहा वर्षे पूर्ण होतील. भूमीपूजनानंतरही सुमारे ४ वर्षे ना. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र दुर्दैवाने त्या चार वर्षात रेल्वे टर्मिनस काम सुरूच झाले नाही. सन २०१९ मध्ये राज्यात मविआ सरकार सत्तेवर आल्याने देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत झाले. त्यानंतर सुमारे अडीच वर्षांनी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. आता २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपने मिळवेलेल्या यशामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस भूमीपूजन विषयाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. भूमीपूजनानंतर सुरूच न झालेले हे काम मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या टर्ममध्ये पूर्ण करणार का ? असा सवाल रेल्वे प्रवासी व तालुकावासीयांमधून व्यक्त होत होत आहे. गेली ९ वर्षे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाची कोनशिला धूळखात उभी आहे. प्रत्यक्ष कामच सुरू न झाल्याने राज्य शासनाकडून सिंधुदुर्गवासीयांची फसवणूक झाल्याची भावना जनतेत आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत कित्येकदा आवाज उठवला आहे. मात्र,आश्वासनांशिवाय हाती काहीच आलेल नाही. अलिकडेच सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे विमानतळाच्या धर्तीवर सुशोभीकरण आले. यावेळी स्थानकाच्या नावातून 'टर्मिनस' हा शब्द हटवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे 'टर्मिनस 'बाबत शासनाच्या हेतूवरच शंका निर्माण झाली आहे. आता ९ वर्षांनी देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने सावंतवाडीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रात व राज्यात 'महायुती'चे महा बहुमत असलेले भाजपचे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या त्या कार्यकळात रखडलेल हे टर्मिनस ना. फडणवीस यांनी आपल्या या टर्म मध्ये पूर्णत्वास न्यावे अशी प्रवासी व जनतेची अपेक्षा आहे.