1 नोव्हेंबर काळादिन गांभीर्याने पाळण्याचे खानापूर म. ए. समितीच्यावतीने आवाहन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक श्री राजा शिवछत्रपती स्मारक येथे म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. यावेळी 1 नोव्हेंबर काळादिन सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन करून केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करून काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे ठरविण्यात आले. काळादिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले असून रविवारच्या बाजारात समिती पदाधिकाऱ्यांनी पत्रके वाटून जागृती केली. उपस्थितांचे स्वागत करून आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले.
बैठकीत समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, विलास बेळगावकर, निरंजन सरदेसाई, मारुती परमेकर, मुरलीधर पाटील, वसंत नावलकर, रुक्माण्णा झुंजवाडकर, गोपाळ पाटील, राजाराम देसाई, रमेश धबाले, शामराव पाटील, रणजित पाटील यांनी विचार व्यक्त केले. येता काळा दिवस तालुक्यातील मराठी सीमावासियांनी गांभीर्याने पाळावा, असे आवाहन करण्यात आले. यासाठी खानापूर शहरात बाजारपेठेत पत्रके वाटण्यात आली. यानंतर मंगळवारी जांबोटी बाजारपेठ, बुधवारी नंदगड बाजारपेठ, शुक्रवारी कणकुंबी बाजारपेठ येथे काळादिन संदर्भात पत्रके वाटून जनजागृती करण्यात येणार आहे.
प्रकाश चव्हाण यांची निवड
सीमाप्रश्नी तज्ञ कमिटीमध्ये खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण यांचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आले आहे. भविष्यात सीमाप्रश्न लवकरात लवकर निकालात लागावा, यासाठी मध्यवर्तीच्या ध्येयधोरणांशी बांधील राहून प्रकाश चव्हाण यांनी तज्ञ समितीवर कार्यरत राहावे, अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला. समिती कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तो पुन्हा एकदा फेटाळण्यात आला. बैठकीला समितीचे पदाधिकारी जयराम देसाई, रमेश धबाले, मारुती गुरव, कृष्णा मन्नेळकर, कृष्णा कुंभार, म्हात्रू धबाले, ब्रम्हानंद पाटील, अजित पाटील, बी. बी. पाटील, रामचंद्र गावकर, अमृत पाटील, प्रकाश चव्हाण, अमृत शेलार, मोहन गुरव, नाना घाडी, संदेश कोडचवाडकर, देवाप्पा भोसले, पुंडलिक पाटील, मरू पाटील, नागोजी पावले यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.