बांगलादेशकडून हिंदूंची क्षमायाचना
सुरक्षा देण्याचे आश्वासन : युनूस यांचा हिंदू विद्यार्थ्यांशी संवाद
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन सुरू असताना आणि त्यांच्या पलायनानंतरच्या काळात तेथील हिंदूंच्या विरोधात हिंसा उफाळून आल्याच्या प्रकरणी त्या देशाच्या अंतरिम सरकारने हिंदूंची क्षमायाचना केली आहे. आम्ही आमच्या कर्तव्याला चुकलो, असे वक्तव्य या अंतरिम सरकारने केले आहे. तथापि, तेथील हिंदू समाजाने सुरक्षा व्यवस्थेसंबंधात असमाधान व्यक्त केले आहे.
नव्या अंतरिम सरकारचे गृहविभागाचे सल्लागार शखावत हुसेन यांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात प्रशासनाकडून चूक झाल्याचे स्पष्ट केले आहे. अल्पसंख्याकांच्या संरक्षणात आम्ही मागे पडलो. त्यामुळे त्यांना बराच त्रास भोगावा लागला. मात्र, यापुढच्या काळात त्यांना संरक्षण दिले जाईल. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे हुसेन यांनी स्पष्ट केले आहे.
परिस्थिती नियंत्रणात
बांगला देशातील हिंसा आता आटोक्यात आली आहे. तसेच देशात शांतता निर्माण होत आहे. लवकरच सर्व प्रशासकीय कामकाज सुरळीत होईल. येथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व केवळ सरकारचे नव्हे, तर ते येथील बहुसंख्याक समाजाचेही आहे, असे प्रतिपादन हुसेन यांनी केले. परागंदा नेत्या शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षालाही त्यांनी इशारा दिला. देशात अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न या पक्षाने केला तर कठोर कारवाई केली जाईल. दयामाया दाखविली जाणार नाही, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.
शेख हसीना यांना परत आणणार
कायदा विभागाने मागणी केल्यास शेख हसीना यांना बांगला देशात परत आणण्यासंबंधी पावले उचलण्यात येतील. त्यांना भारतातून येथे परत आणण्याची आमची इच्छा आहे, अशी घोषणाही नव्या अंतरिम सरकारने केली आहे. आमच्या देशाच्या हिताचे संरक्षण करताना जगातील सर्व देशांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे आमचे धोरण असेल, असे वक्तव्य विदेश विभागाचे सल्लागार तौहिद हुसेन यांनी सोमवारी केले. विदेश धोरण टोकाचे असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अवामी लीगवर बंदी नाही
परागंदा नेत्या शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षावर बंदी घालण्याची कोणतीही योजना नाही. असेही अंतरिम सरकारने स्पष्ट केले. या पक्षाने बांगलादेशच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. ते आम्ही नाकारत नाही. बांगलादेशात लोकशाही असून लोकशाहीत राजकीय पक्षांचे अस्तित्व महत्त्वाचे असते. त्यामुळे या पक्षावर बंद घालण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन करण्यात आले.
हिंदू समाज संतप्तच
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हिंसाचारासंबंधी क्षमा याचना केली असली तरी त्या देशातील हिंदू समाजाचा संताप कमी झालेला नाही. आमचा समाज कोणत्याही बाजूने राजकारणात नाही. या देशात सत्तापालट होत असताना आम्ही त्याला विरोध केला नव्हता. तरीही सत्तेच्या साठमारीत निरपराधी हिंदूंवर अन्याय केला गेला. हिंदूंची हजारो घरे जाळली गेली. तसेच आमच्या संपत्तीची अपरिमित हानी झाली. नव्या अंतरिम सरकारने याची भरपाई द्यावी, अशी मागणी तेथील अनेक हिंदू संघटनांच्या अधिकाऱ्यांनी केली असून आंतरराष्ट्रीय समुदायाला बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याचे आवाहन या संघटनांनी केले आहे.
संरक्षण देण्याची भारताला विनंती
बांगलादेशमध्ये उसळलेल्या दंगलींमध्ये अवामी लीगच्या 50 हून अधिक नेत्यांची हत्या झाली आहे. कार्यकर्त्यांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. कोणीही आमच्या कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी पुढे येत नाही. आता भारतानेच आमचे संरक्षण करावे, येथील परिस्थितीत हस्तक्षेप करावा आणि अवामी लीगच्या नेते आणि कार्यकर्ते यांच्या जीवांचे रक्षण करावे, अशी विनंती या पक्षाच्या अनेक नेत्यांनी भारत सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारने बांगलादेशच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एका विशेष समितीची यापूर्वीच स्थापना केली आहे.